Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. सतीश पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी डॉ. सतीश पाटील यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग या दोन गटांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेतला होता. तर डॉ. सतीश पाटील यांनी अमोल चिमणराव पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. या दोन्ही प्रकरणांवर गुरूवारी सुनावणी झाली.

या सुनावणीत डॉ. सतीश पाटील यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर अमोल पाटील यांच्या विरूध्दचा आक्षेप फेटाळण्यात आला. या प्रकरणी दबावतंत्राचा वापर करून आपल्या विरूध्द निकाल देण्यात आल्याचा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. तर, अमोल पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत निकालातून सर्व काही स्पष्ट होणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. दुसरीकडे डॉ. सतीश पाटील यांनी या प्रकरणी दाद मागणार असल्याचे सांगितले असून यात नेमके काय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version