Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न; आप्तांचा ‘रास्ता रोको’ !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे गोंडगावच्या भयंकर घटनेमुळे समाजमन सुन्न झालेले असतांनाच याच प्रकारची घटना पारोळा तालुक्यात घडली असून अल्पवयीन मुलीने अत्याचाराला विरोध करताच तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पारोळा तालुक्यातील एका गावात देखील असल्याचा प्रकाराची पुनरावृत्ती टळल्याची घटना घडली असून यामुळे नागरिक संतापले आहेत.

पारोळा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी ही शौचासाठी गेली असतांना अशोक उर्फ बारक्या मंगा भील (मोरे) याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी तिने प्रतिकार केल्यामुळे त्याने डोक्यात दगड मारून तसेच दोरीने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल सायंकाळी घडली. पिडीत मुलगी जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी पिडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अशोक उर्फ बारक्या मंगा भील (मोरे) याच्या विरोधात भादंवि कलम ३७६ (३); ३०७; ३५४, ३२३ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४,८, १०, १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तर नागरिकांनी पारोळा येथे रास्ता रोको करून या प्रकरणाचा निषेध केला. पोलिसांनी आप्तांची समजूत काढल्याने आंदोलक शांत झाले.

Exit mobile version