Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाच्या आढावा बैठकीस पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीचीच चर्चा

maharashtra bjp leader pankaja munde file pic 1575197466

औरंगाबाद, वृत्तसंस्था | भाजपाच्या मराठवाडा विभागीय आढावा बैठकीस आज सकाळी १०.०० वाजता येथे सुरूवात झाली. मात्र तोपर्यंत भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे बैठकीच्या ठिकाणी न आल्याने त्या या बैठकीस येणार की नाही ? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, दुपारी बैठक काही वेळासाठी थांबल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून, पंकजा मुंडे या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची बैठकीस अनुपस्थिती असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक व मराठवाडास्तरीय नेत्यांची उपस्थिती आहे.

 

पंकजा मुंडे यांना बैठकीचे निमंत्रण होते. मात्र तब्येत ठीक नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी माझी परवानगी घेतली, त्यामुळे त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. शिवाय त्यांना १२ तारखेच्या कार्यक्रमाची देखील तयारी करायची आहे, त्यामुळे तेव्हा त्यांची भेट होईलच, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर, पंकजा मुंडे बैठकीस येणार की नाही ? याबाबत सकाळपासून सुरू असलेल्या चर्चेस पूर्णविराम मिळाला. मात्र, मागील काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या बैठकीतील त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांनी जोर धरला आहे.

बैठकीत संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मराठवाडास्तरीय आढावा घेतला जाणार आहे. खरंतर आज होत असलेल्या बैठकीत बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा देखील आढावा घेतला जाणार आहे, हे पाहता पंकजा मुंडे यांची उपस्थिती आवश्यक होती, असेही समजते. भाजपाने राज्यात विभागवार बैठकांचा कार्यक्रम सुरू केला आहे. नुकतीच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राची बैठक झाली. आज मराठवाडा यानंतर पश्चिम महाराष्ट्रात या बैठका होणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी, “माझ्या पक्षांतराची अफवा पसरवण्यात येत असल्याने मी व्यथित झाले आहे. मात्र, बंडखोरी माझ्या रक्तात नाही”, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच, १२ डिसेंबरच्या मेळाव्याबाबत समाज माध्यमांवरील संदेशाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी भाजप सोडण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे मी दु:खी झाले आहे, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. मी पदासाठी हे दबावतंत्र वापरत असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मला पदासाठी असे काहीच करण्याची गरज नाही. उलट मला कोणतेही पद मिळू नये, यासाठीच कोणी तरी जाणीवपूर्वक अशी चर्चा घडवून आणत आहे का ? असा सवालही पंकजा यांनी त्यावेळी केला होता.

Exit mobile version