Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंडित मिश्रा यांच्या असंवैधानिक वक्तव्यांवर निर्बंध घालावे; अंनिसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात आयोजित आहे. पंडित मिश्रा हे अवैज्ञानिक, असंवैधानिक, अंधश्रध्देवर आधारित वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करीत असतात. अशा असंवैधानिक वक्त्यव्यांवर निर्बंध घालावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव जिल्हा व शहर शाखेतर्फे शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

प्रवचनकार, किर्तनकार प्रदिप मिश्रा उर्फ प्रभुराम रामेश्वर मिश्रा यांचे शिवपुराण कथा जळगांव शहरात ०५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर महाराजांनी यापुर्वी अवैज्ञानिक, असंवैधानिक आणि अंधश्रध्दांवर काही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत. याबाबतचे विडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत. यामुळे लोकांची दिशाभूल केली जात आहे. एक लोटा जल, समस्याऔका हल यासह बेलाच्या पानावर मध लाऊन महादेवाच्या पिंडीवर चिकटवले तर मुलगा परिक्षेत पास होतो या वक्तव्यांची नोंद आहे. अशा असंवैधानिक, अवैज्ञानिक वक्तव्यामुळे जनतेत अंधश्रध्दा पसरवून बौध्दिक शोषण केले जाते. जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हाच ठरतो.

याकरिता आपण सदर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अवैज्ञानिक, असंवैधानिक वक्त्यव्यांवर निर्बंध घालावा, सदर महाराजांना समज द्यावी, अशीहि मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी स्वीकारले. निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग राज्याचे कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड. भरत गुजर, जिल्हा पदाधिकारी शिरीष चौधरी, शहर शाखेच्या कार्याध्यक्षा कल्पना चौधरी, हेमंत सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version