Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत लाखोंचा गैरव्यवहार- पल्लवी सावकारेंचा आरोप

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून यात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपच्या फायब्रँड जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे. त्यांच्या घरच्या आहेरामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचे वारे सुरू असून या प्रकाराला सत्ताधारी भाजपच्याच सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी तोंड फोडले आहे. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे. या बदली प्रक्रियेत ज्या लोकांनी आर्थिक व्यवहार केले आहेत त्यांचीच नावे स्क्रीनवर दिसली. इतर इच्छुक कर्मचार्‍यांना निलंबित करण्याच्या धमक्या देऊन बोळवण करण्यात आली. काही कर्मचार्‍यांनी त्यांचा कार्यकाळ संपलेला असूनही खाजगी डॉक्टरांकडून बनावट वैदकीय प्रमाणपत्रे सादर करून शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांच्या बदल्या थांबवल्या आहेत. खाजगी डॉक्टरांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्रे बदली प्रक्रियेस कशी चालतील. शासनाच्या कोणत्या जीआर मध्ये याचा उल्लेख आहे याची माहिती मला मिळावी अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दरवर्षी अपंग प्रमाणपत्रामध्ये घोळ होतो. अपंग प्रमाणपत्रामध्ये ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास शासकीय बदलीस पात्र ठरतो. यावर्षी देखील अपंग प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति पाहून वैध असल्याची खातरजमा न करता आर्थिक हितसंबंध जोपासून बदल्या झालेल्या आहेत. काही कर्मचार्‍यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे जोडलेली आहेत. यासाठी सर्व अपंग प्रमाणपत्रे जिल्हा चिकित्सक कडून तपासण्यात यावीत. तसेच या बदल्यांच्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी केली आहे. या प्रक्रियेत अन्याय झालेल्या कर्मचार्‍यांना न्याय न मिळाल्यास संबंधित मंत्रीमहोदय आणि विरोधी पक्ष नेते यांच्याकडे याबाबत कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा सुध्दा पल्लवी सावकारे यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

Exit mobile version