Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराजस्व अभियानास प्रारंभ; हिंदीतील भाषणाने वेधले लक्ष

पाळधी, ता. धरणगाव अलीम देशमुख । राज्य शासनाच्या महाराजस्व अभियास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथून प्रारंभ केला. येथील उर्दू शाळेत ग्रामस्थांना दाखले वाटून याचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान जनतेसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. बिहार निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्यानंतर गुलाबभाऊंनी या कार्यक्रमात हिंदीत भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तालुक्यातील पाळधी बु. येथे उर्दू शाळेत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाराजस्व अभियान अंतर्गत विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखले वाटप करण्यात आले. यात २३ जातीचे दाखले, ५२ उत्पन्नाचे दाखले, ६४ डोमिसाईल प्रमाणपत्र, ५३ नॅशनॅलिटीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण भाषण हे हिंदीतून केले. त्यांची बिहार निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर ना. पाटील यांनी हिंदीतून केलेले भाषण हे उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनले.

अभियान प्रभावीपणे राबविण्याचे दिले निर्देश !

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनामार्फत महाराजस्व अभियान राबविण्यात येते. सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध व्यक्ती, निराधार व्यक्ती अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांचा त्यांच्या दैनंदिन काम – काजासाठी सर्वात जास्त संबंध हा महसूल विभागाची येतो. अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक सामान्य नागरिकाला त्याच्या कामासाठी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे शक्य होत नाही. याची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना दिल्या जाऊ शकणार्‍या योजनांची माहिती व सदर योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत गाव पातळीवर जाऊन देणे बाबत संबंधित अधिकार्‍यांना आदेशित केले होते तसेच समाधान योजनेअंतर्गत शासनाच्या इतर विभागांकडे ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करणे बाबत ना.गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत.

या प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितिनकुमार देवरे, पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड तसेच शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी अभियानाची व्याप्ती व महत्व विशद केले. सूत्रसंचालन सईद शाह सर यांनी केले तर आभार मुश्ताक करिमी सर यांनी मानले.

Exit mobile version