दुहेरी मृत्यू प्रकरणी विवाहितेच्या वडिलांवर गुन्हा

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथे प्रेमविवाह केल्यानंतर काही दिवसांमध्येच मृत झालेल्या दाम्पत्याच्या मृत्यूला आता कलाटणी मिळाली आहे. आधी मुलाच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल झाला असतांना आता मुलीच्या वडिलावर देखील आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पाळधी येथील तरूणीने प्रेमविवाह केल्यानंतर तिचा दोन दिवसातच विष प्राशन केल्याने मृत्यू झाला. तर विष प्राशन केलेल्या तिच्या पतीचाही शनिवारी सकाळी मृत्यू झाला. पाळधी येथील प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणाचे गावातील आरती विजय भोसले हिच्याशी प्रेम होते. यातून त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता. काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. यानंतर अचानक काल सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. तर मागील खोलीत तिचा पती प्रशांत हा देखील बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. यानंतर शनिवारी सकाळी प्रशांतचाही मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

आदल्या दिवशी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून मुलगा, त्याचे वडील आणि मित्र आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती प्रशांत पाटील, सासरा विजय पाटील आणि पतीचे दोन मित्र विजय उर्फ विक्की बोरसे आणि अजय कोळी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. तिघांना अटक करून शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली.

तर काल सकाळी तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेत मुलीच्या घरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्याची बहीण कविता सुनील पाटील यांनी पाळधी पोलिसांकडे फिर्याद दिली. पहिल्यांदा दिलेली फिर्याद नंतर बदलण्यात आली. दुसर्‍या फिर्यादीत प्रशांतची पत्नी अर्थात मृत विवाहितेच्या वडिलांनी ३१ डिसेंबरच्या रात्री घरी येऊन धमकावल्यामुळे दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करून घेतली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार मृत विवाहितेचे वडील विजय हरसिंग भोसले यांच्या विरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content