Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाकिस्तान ड्रोनद्वारे करतोय भारतात शस्त्र पुरवठ्याचा प्रयत्न

drone

फिरोजपूर, वृत्तसंस्था | पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पंजाबच्या फिरोजपूरमधील हुसेनवाला सीमेवर हे ड्रोन पाच वेळा आल्याचे दिसले आहे. पाकिस्तान भारतात पुन्हा एकदा ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतीय हद्दीत ड्रोन घुसल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने पंजाब पोलिसांना दिली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पाठवलेले हे ड्रोन सोमवारी रात्री भारतीय हद्दीत उडत असल्याचे दिसले. याबाबत प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत आल्याचे दिसताच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाब पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळपासूनच पंजाब पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे शोध मोहीम हाती घेतली आहे.

बालाकोटनंतर पाकचा नवा पवित्रा
पुलवामा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’च्या प्रशिक्षण तळांना नष्ट केले होते. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताला छुप्या पद्धतीने त्रास देणे सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान आपल्या दहशतवाद्यांना हत्यारे पुरवण्यासाठी अशा ड्रोनचा वापर करत आहे.

ड्रोनचा वापर हत्यारे पोहोचवण्यासाठी
पाकिस्तानने भारताच्या हद्दीत पाठवलेले हे ड्रोन सीमेपलीकडून जीपीएसद्वारे संचलित होतात. तसेच, भारतात दाखल झालेल्या अनेक ड्रोन्समध्ये १० किलोपर्यंतची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. पंजाब पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनचा वापर करून पाकिस्तान एके-४७ रायफली, हँड ग्नेनेड आणि पिस्तुलांसारख्या शस्त्रांचा पुरवठा करत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दल सावध झाले आहेत.

ड्रोनचा धोका संपूर्ण जगापुढे
दोन आठवड्यांपूर्वी सौदी अरबच्या दोन मुख्य ऑइल प्लांट्सवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. यमनच्या हूती विद्रोहींनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ऑइल प्लांट्सवर झालेल्या या हल्ल्याला ईराण जबाबदार असल्याचे सौदी अरबने म्हटले होते. याबरोबरच गेल्याच महिन्यात एका शक्तिशाली स्फोटाद्वारे दोन ड्रोन्सच्या मदतीने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्यतिरिक्त, कुख्यात दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’ने सन २०१४ पासूनच ड्रोनचा वापर करायला सुरुवात केली आहे.

Exit mobile version