Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी


नवी दिल्ली (वृत्तसेवा) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईसाठी मोदींवर दबाव वाढत आहे. इस्रायल, अमेरिका, रशियासारख्या देशांनीही भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, भारतानं निर्णायक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता लक्षात घेऊन आधीच पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे दिसत आहे. त्याने आधीच बचावाची तयारी सुरू केली आहे.

भारताने सीमेवर लष्कराच्या हालचाली सुरु करण्याआधीच पाकिस्ताननं सर्व लष्करी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराने जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास सांगण्यात आलं आहे. राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून, सामान्य रुग्णालयांमध्ये जवानांसाठी २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आलं आहे’.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तिथून हटवलं आहे. पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्यावेळी गरज नसल्यास विजेचे दिवे लावू नका, असे निर्देश पाकिस्तान सरकारनं पीओकेमधील लोकांना दिले आहेत. युद्धाच्या परिस्थितीत क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सामान्य आणि लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांना दाखल केलं जाऊ शकतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याची योजना आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानानं पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक गावांना रिकामी केलं आहे, तसेच इतर लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरील लोकांचं ये-जा करणं थांबवलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या १२७ गावांना हायअलर्ट जारी केला आहे. नियंत्रण रेषेजवळच्या ४० गावांना रिकामे केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरलं आहे. भारतीय शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत भारतानं पाकिस्तानला दिले आहेत. त्यामुळे पाकची गाळण उडाली आहे.

Exit mobile version