Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकास मल्हारा यांना ‘टागोर पुरस्कार’ प्रदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, भोपाळ यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत चित्रकार विकास मल्हारा यांना नुकताच यंदाचा ‘टागोर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

“गतिशील मन, चित्रात मुक्त होऊन जातं, घडत जातं कळत नकळत आकारात किंवा निराकारात किंवा आपल्या मूळ अस्तित्वात…निरवतेत” असे काव्यात्मक सृजन लिहिणारे विकास मल्हारा यांना यंदाचा ‘टागोर अवॉर्ड’ रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ द्वारा आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच भोपाळ येथे सन्मानित करण्यात आले.

चित्रकार विकास मल्हारा यांना  रु.५०,०००/-, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. जैन इरिगेशनच्या कला विभागात कार्यरत असलेले विकास मल्हारा यांना प्रख्यात चित्रकार व लेखक अशोक भौमिक व कुलगुरू लेखक संतोष चौबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण भारतातून आलेल्या २००० कलाकृतींतून अंतिम पाच पुरस्कारात त्यांच्या ॲक्रॅलिक व चारकोलसह पेपर या माध्यमात केलेल्या “अनटायटल्ड-३” या चित्राची निवड झालेली होती.

पाश्चात्य कला क्षेत्रातील १९ व २० व्या शतकातील कलावाद ते समकालीन कला अशा विविध कला प्रवाहांच्या सखोल अभ्यास, चिंतनशीलतेतून विकास मल्हारा यांनी आपली स्वतःची अमूर्त कलाशैलीचा शोध व अभ्यास करीत असावे. त्याला कबीर, सुफी, ओशो साहित्याची जोड दिली. अंतःप्रेरणा आणि स्वत: जगण्यातील अनुभव यांची सरमिसळ त्यांनी आपल्या चित्रकलेतून केली‌. “या अतरंगी अंतरंगातून भावनांचा आवेग घेऊन माझे चित्र नकळत्या आभासी आकारातून उमलत जाते, माझी अमूर्त चित्रे म्हणजे माझे समर्पण होय.” त्यांच्या अशा समर्पित चित्रावकाशात मातकट,काळपट आणि करड्या रंगाचा संयमित उत्सव असतो. रंग आकारांच्या संगतीला रेषांचा अनवट साज असतो. पद्मश्री भवरलालजी जैन यांचा आशीर्वाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचे प्रोत्साहन, अमूर्त चित्रकार गुरुवर्य प्रभाकर कोलते व चित्रकार वासुदेव कामत यांचे मार्गदर्शन नेहमीच त्याच्यासाठी उर्जास्रोत आहे. चित्रकार प्रकाश वाघमारे, जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, प्राचार्य राजेंद्र महाजन, चित्रकार राजू बाविस्कर यांच्यासह कलाप्रेमींनी विकास मल्हारा यांचे कौतूक केले आहे.

 

 

Exit mobile version