पहूर येथील शेतकरीपुत्र डॉक्टर न्यूरोलॉजी परीक्षेत देशात पहिला !

पहूर. ता. जामनेर-रवींद्र लाठे | येथील एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील डॉ. गोपाल अरूण घोलप यांचा न्युरॉलॉजीच्या परिक्षेत देशातून पहिला क्रमांक आला असून या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील तरूणाईच्या गुणवत्तेची अमीट मोहर उमटवली आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने आयोजित केलेल्या परीक्षा सत्र डिसेंबर २०२० मध्ये न्यूरोलॉजी या विषयात पहूर येथील डॉ. गोपाल अरुण घोलप (एम.बी.बी.एस.; एम.डी. मेडिसीन, डीएनबी, फेला इंटरव्हेन्शन न्युरोलॉजी ) यांनी देशातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. त्यांना नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स तर्फे न्यूरोलॉजी याविषयात गोल्ड मेडल घोषित झाले आहे. त्यांनी त्यांचे ह्या विषयातील शिक्षण देशात नामांकित असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथून शिक्षण प्राप्त केले. सध्या ते इंटरव्हेन्शन न्युरोरेडिओलॉजी म्हणजेच बिना टाक्याच्या मेंदूच्या शत्रक्रियेचे शिक्षण मुंबई येथून घेत आहेत.

डॉ. गोपाल अरुण घोलप हे एका शेतकरी कुटुंबात जन्मले. पहूर सारख्या ग्रामीण भागात त्यावेळी इंग्रजी शिक्षणाचा बडेजाव नव्हता. त्यामुळे प्राथमिक शिक्षण पहूर पेठ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले इयत्ता चौथी असतांनाच शिष्यवृत्ति परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादित करून चुणुक दाखविली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. माध्यमिक शिक्षणासाठी पालकांनी जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेतला. आणि दहावी व बारावीच्या परीक्षेतही चांगले यश मिळविले. यानंतर मात्र काही तरी वेगळे करण्याची इच्छा व वडील अरुण घोलप यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास उराशी बाळगुन असलेल्या गोपाल घोलप यांनी नीट परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात पाहिजे ते वैद्यकीय महाविद्यालय न मिळाल्याने दुसर्‍या प्रयत्नात २००७ मध्ये एन. टी. प्रवर्गातुन राज्यात तेरावा क्रमांक प्राप्त करून एम. बी. बी. एस.चे शिक्षण मुंबई येथील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले.

यानंतर डॉ. गोपाल घोलप यांनी २०१४ मध्ये एम. डी. प्रवेश परीक्षेत एन. टी. प्रवर्गातुन राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादित करुन एम. डी. मेडिसीन पदवी प्राप्त केली. यावरही न थांबता शिक्षण सुरुच ठेवण्याचा निर्धार करीत डी. एन. बी. न्यूरोलॉजी प्रवेश परीक्षेत यश मिळवित कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल मध्ये शिक्षण पूर्ण करून याच हॉस्पीटल मध्ये फेलो इंटरव्हेन्शन न्युरोलॉजीचे शिक्षण घेत असतांना डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. यात डॉ. गोपाल घोलप यांनी देशात अव्वल क्रमांक मिळवून पहूर चे नाव उज्वल केले आहे.

सध्या ते बिना टाक्याच्या मेंदूच्या शत्रक्रिया या विषयाचा अभ्यास मुंबई त करीत आहे. त्यांच्या यशाचे श्रेय आई वडील, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटल मधील न्यूरोलॉजी विभागातील सर्व शिक्षक, मित्र परिवार व पहूर येथील घोलप परिवराला देतात. डॉ. गोपाल घोलप यांची पत्नी डॉ.असावरी घोलप (एम.डी. पॅथॉलॉजी) या न्यूरो पॅथॉलॉजी चे शिक्षण के ई एम हॉस्पीटल, मुंबई येथून घेत असून लहान भाऊ डॉ. सिद्धांत घोलप(एम. डी. बालरोग तज्ञ)असून सदयस्थितित लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात मुंबई येथे शिक्षण घेत आहे. तर दूसरा भाऊ डॉ. अमोल घोलप जामनेर तालुक्यातील शेंदुर्नी येथे लहान मुलांचा दवाखान्यात सेवा देत आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर सारख्या ग्रामीण भागात राहून त्याच ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी परिस्थितिची कोणतीही तमा न बाळगता आपल्या हुशारीच्या जोरावर मजल दर मजल करीत पहूर गावाचे नाव देशपातळी वर उंचावतो त्याचा सार्थ अभिमान आज पहूर कारांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे. डॉ. गोपाल घोलप यांच्या यशा बद्दल माजी मंत्री गिरीश महाजन, पहूर पेठ च्या सरपंच नीता पाटील, कसबे च्या सरपंच आशा जाधव, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख रामेश्वर पाटील, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे, लेले हास्कुलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, माजी सरपंच प्रदिप लोढा, शेंदुर्नी जिनिंगचे संचालक शाम सावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दौलत घोलप बाजार समितीचे सभापती संजय देशमुख शेतकरी संघाचे संचालक साहेब राव देशमुख यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

Protected Content