Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंधार्‍यात बुडून चुलत बहिण-भावाचा मृत्यू

पहूर, ता . जामनेर रविंद्र लाठे | आई-वडील बाहेरगावी वर्षश्राद्धाला गेले असताना घरापासून जवळच असलेल्या केटीवेअर बंधार्‍या पर्यंत खेळत गेलेल्या चिमुकल्या चुलत बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथुन जवळच असलेल्या जांभूळ येथे आज घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथून जवळ असलेल्या जांभूळ गावापासून जवळच थोड्या अंतरावर नितीन एकनाथ जोशी आणि गोरख एकनाथ जोशी हे दोघे सख्खे भाऊ राहतात. तालुक्यातील गंगापुरी येथील मूळचे रहिवासी असलेले हे भाऊ मजुरी तसेच भिक्षुकी करून आपला चरितार्थ चालवितात. आज रविवारी शेंगोळा (ता .जामनेर ) येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी नितीन जोशी हे त्यांच्या पत्नीसह गेले असताना त्यांची ९ वर्षांची मुलगी पायल नितीन जोशी आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र गोरख जोशी हे दोघे चुलत बहीण भाऊ खेळत खेळत दुपारच्या सुमारास घरापासून जवळच अंतरावर सुभाष रामदास शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत गेले.

खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी त्यावेळी कुणीही उपस्थित नव्हते. सहज म्हणून मयत रुद्रचे मामा मुकुंदा हरी जोशी केटीवेअर बांधापाशी आल्यावर त्यांना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी लगेचच मुलांच्या आई-वडिलांशी संपर्क केला. चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला . घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे , हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्दैवी चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.

आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघा बहिण भावावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जांभूळ गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.

दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ रुद्र गेला

चिमुकला ६ वर्षीय रुद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो जांभूळ येथील अंगणवाडीत शिकत होता ,तर मयत पायल जांभोळ येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या गृह भेटीतून दोघे बहिण-भाऊ अभ्यास करत होते. गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, भानुदास तायडे , मुख्याध्यापक नाना धनगर आणि शिक्षक राजेंद्र भोई ,वर्गशिक्षक भास्कर इंगळे यांनी निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पायलच्या पश्च्यात तीन बहिणी आई-वडील असा परिवार आहे . या चिमुकल्या निरागस चुलत बहीण भावांच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

Exit mobile version