Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळण्याच्या सुविधेला प्रारंभ

vignaharta

 पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेला ८ मार्च २०१९ पासून शुभारंभ झाला आहे. जिल्हयात गेल्या साडेतीन वर्षांनंतर प्रथमच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयास महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस शासनाकडुन मान्यता मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात व पाचोरा सारख्या तालुक्याच्या ठिकाणी १२० खाटांच्या आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या गोर-गरिब रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या योजनेस शनिवारपासून सुरूवात झाली आहे, अशी माहिती विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भुषण मगर, डॉ.सागर गरुड, डॉ.प्रिती मगर, डॉ.अंबिका घोष यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासनमान्य महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत संकल्पनेतील पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत अॅन्जोग्राफी, अॅन्जोप्लास्टी, जनरल सर्जरी, अॅथोपॅडीक सर्जरी, आय.सी.यु., एन.आय.सी.यु., सी.टी.स्कॅन, एम.आर.आय., स्रीयांचे विविध आजार, बालरोग उपचार, डायलेसिस, न्युरो सर्जरी, युरो सर्जरी, २ डी ईको, कलर डाॅप्लर, स्री – आर्म यासह ९७१ प्रकारच्या शस्रक्रिया व १२१ आजारांच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. यासाठी एक एम.डी. (मेडीसीन), एक डी.एन.बी. मेडीसीन, एक डी.एन.बी. सर्जन, एक गायनोकॉलॉजिस्ट, एक आर्थोपेडिक, एक पॅथोलॉजिस्ट, दोन बालरोग तज्ज्ञ, दोन कार्डियोलॉजिस्ट अशा तज्ञ डॉक्टरांची टीम तत्पर सेवेसाठी उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केशरी, पिवळे, अन्नपुर्णा योजनेतील रेशनकार्ड धारकांचा समावेश करण्यात आला असून या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र शासनमान्य तज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉ. भुषण मगर यांनी यावेळी दिली. या रुग्णालयात जिल्हयासह अजिंठा डोंगर माळा परिसरातील कन्नड, सोयगांव, सिल्लोड तालुक्यातील गोर-गरिब रुग्णांना सेवा मिळणार असल्याने रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version