Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेत समावेश करण्याबाबत निवेदन 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास यांचा शासन निर्णय दि. १७ फेब्रुवारी २२ च्या अनुषंगाने राज्याचे कृषीमंत्री यांनी मालेगावातील सर्व गावांचा समावेश पोखरा योजनेत केला. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करावा. या मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातर्फे कृषीमंत्री दादा भुसे यांना पाठवले असुन निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी यांना देखील दिली आहे.

परंतु त्याच धर्तीवर आमच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करावा. या आग्रही मागणीचे निवेदन कृषीमंत्री दादा भुसे यांना पाठवले असुन, सदर निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी यांना देखील दिली आहे.

यासाठी आमदार किशोर पाटील यांनी देखील आज पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी करावी, अशी रास्त मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे.

आज अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी ही मागणी केली. तसेच अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबविण्यात येत आहे. सदरील प्रकल्प शेतकऱ्यांकरिता मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत असून या प्रकल्पात पाचोरा तालुक्यातील – ३१ गावे व भडगाव तालुक्यातील – १७ गावे अशा एकूण ४८ गावांचा समावेश यामध्ये आहे.

परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करतेवेळी, प्राप्त होणाऱ्या निवेदन व ग्रामपंचायतीच्या ठरावा नुसार सदरील प्रकल्पात नव्याने गावे समाविष्ट होण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असुन आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करतो की वरील संदर्भानुसार ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश पोकरा योजनेत होणे बाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.

त्याच पद्धतीने आमच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील उर्वरित सर्व गावांचा देखील समावेश नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेत करण्यात यावा. जेणेकरुन शेतकरी/शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपन्यांना भाडेतत्त्वावर कृषी औजारे बँक खरेदी करणे, शेडनेट / पॉलिहाऊस मध्ये संरक्षित शेती करणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान अवगत करून प्रक्रिया युनिटची स्थापना करणे, गोदाम / वेअर हाऊस उभारणे, सामूहिक शेततळे व अस्तरीकरण करणे, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणे, मधुमक्षिका पालन करून रोजगार निर्माण करणे इ. बाबींकरिता चांगल्या पद्धतीने अनुदान उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना “आत्मनिर्भर” करण्याच्या दृष्टीने मोठी मदत होईल.

दिलेल्या निवेदनाचा एक विशेष बाब म्हणून कृषीमंत्र्यांनी विचार करून आमच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील राहिलेली सर्व गावांचा समावेश पोकरा योजनेत करण्याबाबत निर्णय घ्याल. अशी आशा अमोल शिंदे यांनी व्यक्त केली असुन आपल्या तालुक्याचे आमदार हे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे असुन कृषीमंत्री देखील त्यांचाच पक्षाचे आहेत. त्यामुळे आमदार किशोर पाटील हे नक्कीच पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची ही समस्या कृषी मंत्र्यांकडून नक्कीच मार्गी लावतील व असे झाल्यास आमदार यांचा भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगावच्या वतीने जाहीर सत्कार देखील करू असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

या निवेदनाच्या प्रती त्यांनी मा. ना. गुलाबरावजी पाटील (मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री जळगाव) तसेच प्रधान सचिव (कृषि), आयुक्त (कृषि), प्रकल्प संचालक (नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प), जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांना माहितीस्तव सादर केल्या आहेत.

याप्रसंगी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,पं.स. सभापती वसंत गायकवाड, पं.स. मा. सभापती व सदस्य बन्सीलाल पाटील, पं. स. सदस्य ज्ञानेश्वर सोनार, सरचिटणीस गोविंद शेलार, नगरसेवक विष्णू अहिरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, विरेंद्र चौधरी, योगेश ठाकूर, प्रशांत सोनवणे, मच्छिंद्र पाटील, अमोल नाथ यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version