Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोर्‍यातील व्यापार्‍यांना दीर्घ मुदतीने मिळणार व्यापारी गाळे

पाचोरा, प्रतिनिधी | येथील कै. के. एम. बापू पाटील व्यापारी संकुलातील दुकानदारांना २९ वर्षे मुदतीच्या दीर्घ कराराने व्यापारी गाळे मिळणार आहे. आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दुकानधारकांना न्याय मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा येथील कै. के. एम. (बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत सदरील गाळे दिर्घमुदतीने देण्याची मागणी काही व्यापारी बांधवानी केली होती. सदर गाळ्यांचे भाडे कमी करणे व सदरील गाळे दिर्घमुदतीने अर्थात २९ वर्षे कराराने देणे बाबत पालिका प्रशासनास विनंती केली होती. दरम्यान व्यापारी बांधवांच्या मागणीची दखल घेत आमदार किशोर पाटील यांचे विनंतीवरून ना. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान मंत्री महोदयांनी गाळे दिर्घमुदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे.

नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र जावक क्रं. एम. यु. एम. २०२१ / प्र. क्रं. २७२ / नवी १७ दि. ३० सप्टेंबर २०२१ अन्वये जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन स्वयंस्पष्ट अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यासचे आदेश दिले आहेत व त्यानुसार पाचोरा पालिकेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कडे सादर केला आहे. त्यामुळे आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश येणार आहे. या बैठकीला आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे हे ऑनलाईन उपस्थित होते. सदर नविन गाळ्याचे भाडे कमी करणे व गाळे दिर्घ मुदतीने भोगवटाने देण्याकरिता सकारात्मक चर्चा झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर गाळे दिर्घ मुदतीने देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनास दिले आहे. यावेळी नगरविकास विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव व डॉ. राजेश कावडे उपस्थित होते.दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी ना. शिंदे यांचेकडे राज्यातील सन – १९९३ पूर्वी सेवेत रोजंदारी कर्मचारी म्हणून दाखल झालेल्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क देण्याबाबत मागणी केली होती. या मागणीला देखील मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे पाचोरा नगरपालिकेच्या ६० कर्मचार्‍यांसह राज्यभरातील सफाई कामगार बांधवाना याचा लाभ मिळणार आहे.

या संदर्भात आमदार किशोर पाटील म्हणाले की, शासनाच्या या होऊ घातलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ राज्यभरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे धारक व्यापारी बांधवांना व सफाई कामगार बांधवांना होणार असून ही त्यांना शासनाकडून जणू दिवाळी भेट मिळणार आहे.

Exit mobile version