Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा नगराध्यक्ष अपात्र : जिल्हाधिकार्‍यांच्या निकालाने खळबळ

पाचोरा गणेश शिंदे । येथील शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय नाथालाल गोहील यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र घोषीत केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, २०१६च्या अखेरीस झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय नाथालाल गोहील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर विराजमान झाले होते. मात्र त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत तक्रार करण्यात आली होती. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पराभूत झालेले उमेदवारी अजय भास्कर अहिरे यांनी त्यांच्या विरूध्द जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली. या प्रकरणी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५१-१ब प्रमाणे निकाल देत संजय गोहील यांना अपात्र घोषीत केले आहे. काल उशीरा हा निकाल देण्यात आला असून संबंधीतांना याची प्रत पाठविण्यात आलेली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा आणि त्यांना विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू होत असतांनाच शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना अपात्र जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढे काय होणार ? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हे तर राजकीय षडयंत्र- गोहील

या प्रकरणी प्रस्तुत प्रतिनिधीने संजय गोहील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, मी नियमानुसार सर्व प्रमाणपत्रांची पूर्तता केलेली आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी कुणाच्या तरी दबावाखाली हा निकाल दिला असून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

लढाई सुरूच राहणार-अहिरे

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार अजय भास्कर अहिरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांवर दबाव टाकण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. कारण राज्यात आमची सत्ता नाही. खरं तर, मी आधीच जात पडताळणी समितीकडे तक्रार केलेली आहे. मात्र तेथे मला न्याय मिळाला नाही. आता जिल्हाधिकार्‍यांच्या निकालामुळे हा अन्याय दुर झाला आहे. या पुढेही मी लढाई सुरूच ठेवणार असल्याचे अहिरे म्हणाले.

Exit mobile version