Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. नवनीत राणा यांच्यावर कठोर कारवाई करा : पोलिस बॉईज असोसिएशन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलिसांबाबत अवमानकारक वक्तव्य करून त्यांना धमकावणार्‍या खासदार नवनीत राणा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनने केली असून याबाबत आज निवेदन देण्यात आले.

पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. यात म्हटले आहे की, खा. नवनीत राणा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे कार्यालयात पोलिसांचे सुरू असलेल्या चौकशीत पोलिस अधिकार्‍यांना अक्षरश: धमकावले. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दबावाखाली घेऊन प्रकरणाची दिशाभूल करत लव्ह जिहाद सारखी घटना नसतांना याचा आव आणून स्वत:चे राजकिय अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने पोलिस अधिकार्‍यांवर दबाव आणला व शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या कामकाजात अडथळा निर्माण केला. हा प्रकार अतिशय निंदनीय व माणुसकीला न शोभणारा आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, खासदार नवनित राणा यांचे विरुद कठोर कारवाई व्हावी कारण त्यांच्या या वर्तनामुळे समाजात हिंदू – मुस्लीम ऐक्यास धोका होत आहे. व पोलिसांच्या कामकाजाविषयी जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. म्हणुनच खा. नवनीत राणा यांचेवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख, सचिव प्रफुल्ल पाटील, उपतालुका अध्यक्ष करण पाटील, मंगलसिंग पाटील, बंटी पाटील, निलेश चौधरी उपस्थित होते.

Exit mobile version