Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरीब कुटुंबातील वैभवची कुस्ती व ज्युडोत भरारी !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील अतिशय गरीब घरातील वैभव परदेशी याने ज्युडो व कुस्ती स्पर्धेत यश मिळवून आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु ह्या छोट्याश्या गावातील मोटारसायकल पंचरचे दुकान चालवित संसाराचा गाडा ओढणार्‍या कुटुंबातील वैभव जयसिंग परदेशी याने अलीकडेच चंद्रपूल जिल्ह्यातील मुल येथे पार पडलेल्या १९ वर्षाच्या आतील गटातील फ्रिस्टाईल ज्युडो व कुस्ती स्पर्धेत यशस्वी कामगिरी कांस्य पदक पटकावले असुन वैभव याची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

वैभव जयसिंग परदेशी हा पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा येथील विद्यालयाचा विद्यार्थी असून याच ठिकाणी जिल्हा स्तरावरील कुस्ती व ज्यूडो स्पर्धेची चाचणी झाली. वैभव यास गावात भैरवनाथ मंदिर परिसरात होणार्‍या कुस्त्यांच्या दंगलीमधुन प्रेरणा मिळाली. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या वैभव परदेशी यांचे वडील जयसिंग शामसिंग परदेशी ह्यांना लहानपणापासून कुस्तीची आवड असल्याने ते तालुका स्तरापर्यंत कुस्ती खेळले आहे. मात्र त्यांना पुढे जाण्यासाठी परिस्थिती आड आली म्हणून त्यांनी मुलगा वैभव ह्यास चांगली मेहनत व त्याच्यातील चिकाटी पाहून वैभव यास देश पातळीवरील नामांकित पहेलवान बनविण्यासाठी चंग बांधला आहे.

सावखेडा बु व परीसरात कुस्ती खेळण्यासाठी आधुनिक यंत्रणा नसल्याने वैभव यास चांगल्या प्रतीचे व राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील व क्रिडा मंत्री राज्य सरकार यांचेकडे लेखी निवेदन देवून मागणी केली आहे. वैभव परदेशी याच्या उत्कृष्ट कामगिरी मिळविल्याने वैभव याची गावातुन भव्य सत्कार मिरवणूक काढण्यात आली. वैभव याचे विविध स्तरातुन कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version