Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परत या. . .परत या : शिवसेना उपजिल्हाप्रमुखांची आ. किशोरआप्पांना साद !

पाचोरा, नंदू शेलकर | शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकीय भूकंप आला असतांना आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले पाचोरा-भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी स्वगृही परत यावे अशी आर्त हाक त्यांचे सहकारी तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय पाटील यांनी मारली आहे. या संदर्भातील अभय पाटील यांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले असून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात तीव्र प्रतिक्रीया उमटतांना दिसून येत आहेत. तर आमदारांचे काही साथीदार संभ्रमात देखील पडले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना त्यांचे निकटचे सहकारी तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड. अभय पाटील यांनी त्यांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी आप्पांना उल्लेखून एक पत्र जारी केले असून याला सोशल मीडियात जोरदार प्रसिध्दी मिळाली आहे. आपल्यासाठी हे पत्र जसेच्या तसे सादर करत आहोत.

आमचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना कळवळून विनंती…

प्रिय मित्र किशोर आप्पा,
जय महाराष्ट्र!

*श्रध्येय बाळासाहेब ठाकरे* यांच्या आशिर्वादाने आणि आदरणीय स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या सांगण्यावरून हवालदारची नोकरी सोडून आपण राजकारणात आलात आणि लगेच पाचोरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झालात, त्या नंतर *प्रबोधनकार ठाकरेंच्या* संकल्पनेतील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तुम्ही निर्विवाद जिल्हाप्रमुख झालात, तुमच्या या कर्तृत्वाकडे बघुन तात्यांनी आणि आदरणीय बाळासाहेब व आदरणीय उद्धवसाहेब यांनी तुम्हाला आमदारकी बहाल केली. तुमच्या यशाचा आलेख वाढता राहिला. जिल्हा बँक, दूध डेअरी, मार्केट कमिटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद* अश्या अनेक राजकीय आखाड्यात तुम्ही फक्त शिवसेनेच्या साहाय्याने स्थिर झालात. हे सगळे दिले तुम्हाला ते *बाळासाहेब आणि उद्धवसाहेब यांच्या शिवसेनेने! शिवसेना या संघटनेला निष्ठेने आणि प्रामाणिकपणे स्वतःला समर्पित केलेल्या शिवसैनिकांनी!!

आप्पा, ज्या संघटनेने, त्यातील गोरगरीब सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनी अंगावर वार झेलून विरोध करून प्रसंगी जेलमध्ये जाऊन तुम्हाला आमदार केले. ज्याच्या जिवावर आज तुमचे विविध उद्योगांचे साम्राज्य, सत्ता संपत्ती आणि मान मनसबदाऱ्या उभ्या राहिलेल्या आहेत. हि तीच उध्दवसाहेबांची शिवसेना.

आज आप्पा तुम्ही हे सगळं ज्या संघटनेतील निष्ठेमुळे उभे राहिले, त्या संघटनेला सोडून, कार्यकर्त्यांच्या भावनांचा मताचा विचार न करता, ज्या ७२००० मतदारांनी तुम्हाला मतदान केले, त्यांच्या विचारांची कदर न करता, त्या संघटनेच्या विरुध्द, आदरणीय बाळासाहेबांचे वारस उद्धवसाहेब यांच्या विरुद्ध (ज्यांच्या पाठीशी कायम राहण्याचे वचन तुम्ही बाळासाहेबांना त्यांच्या अखेरच्या क्षणी दिले होते) जाऊन तुम्ही क्षणीक मोहापायी दिल्लीच्या औरंगजेबी मोदी-शा जोडीच्या नादी लागून आपण जे पाऊल उचलले आहे ते तुम्हाला आत्मनाशाकडे नेत आहे. आप्पा उभ्या महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या मतदारसंघासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या तुमच्यासारख्या आमदाराने आपले राजकीय जीवन इतक्या लवकर संपवण्याची घाई करू नये. हि तुमच्याबद्दलची प्रचंड काळजी आणि प्रेम यामुळे हा पत्र प्रपंच!!

आप्पासाहेब, हा मोदी आणि शहा वंदनिय बाळासाहेब ठाकरे व सत्यप्रखर वचनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेला संपवायला निघालेला आहे. मात्र हे तर तुम्हालाही चांगलेच ठावूक आहे, तो काय त्याचा बाप ही नरकातून आला तरीही शिवसेना व त्यातील मराठी माणसांच्या अस्मितेला व शिवसेना पक्षाला कधीही संपवू शकणार नाहीत. शिवसेना एक विचार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. शिवसेना नसती तर तुम्ही मी केव्हाच आपली अस्मिता ओळख सोडून गुलामगिरीच्या दावणीला बांधली गेलो असतो. आप्पा, आज शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेले केंदीय मंत्री जेवत्या ताटावरून जेलमध्ये गेलेत हे मी, तुम्ही बघितले आहे. बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, विजय गावित, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांचे हाल तुम्ही आम्ही डोळ्यांनी बघितले आहेत. अशी खूप उदाहरणे आहेत भाजपच्या नादी लागून संपलेल्या राजकीय हस्तींची!

आप्पासाहेब, हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांसाठी त्यांच्या मावळ्यांनी आपली जात, धर्म गोत्र सगळं विसरून फक्त स्वराज्यासाठी आपली स्वतःची आहुती दिली आहे. औरंगजेबाकडे प्रचंड संपत्ती होती, अखंड हिंदुस्तानाचे साम्राज्य होते, त्याच्या जोरावर असे पाच पन्नास (५-५०) कावळे विकत घेऊन शिवाजी महाराजांना , संभाजी महाराजांना व मराठी माणसाच्या हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या स्वराज्याला संपवण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्याच्या दुर्दैवाने गेलेले कावळे संपले, निष्ठावान मावळ्यांनी स्वतःचे आत्मबलिदान केले परंतु स्वराज्य व शिवरायांना धक्का सुद्धा लागू दिला नाही. स्वराज्याच्या रोजच्या राज्यकारभारात शिवरायांनी व संभाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना कुठे रोज दर्शन दिले, मात्र त्यांनी आपल्या मावळ्यांना कधीही अंतर दिले नाही. प्रत्येक मावळा हा माझा आप्त आहे या भावनेतून महाराजांनी स्वराज्य उभ केल. पुरंदराच्या युद्धावेळी राजा जयसिंग हा हिंदू राजा औरंगजेबाचा गुलाम होऊन स्वराज्यावर चालून आला, स्वराज्यातील काही बंडगुळांना त्याने साम दाम दंड भेद वापरून स्वराज्याच्या विरुद्ध फितूर केले. तेव्हा महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. आपल्या ताब्यात महत्त्वाचे ९० टक्के किल्ले महाराजांना औरंगजेबाला द्यावे लागले. फक्त १६ किल्ले महाराजांकडे होते. आपल्या मुलाला संभाजी राजांना औरंगजेबाची मनसबदारी घ्यायला लावली. परंतु महाराज डगमगले नाही, आग्र्यावरून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटून महाराज पुन्हा रायगडावर आले आणि त्यांनी १६ चे साडेतिनशे किल्ले पुन्हा उभे केले.

आप्पा, असे पाच पंचवीस आमदार पळून गेले म्हणून शिवसेनेचे मराठी अस्मितेचे हे साम्राज्य संपणार नाही. दिल्लीच्या मनुवादी औरंगजेबाचे शिवसेना संपवण्याचे मनसुबे हा महाराष्ट्र कधीही पूर्ण होऊ देणार नाही. इतिहास आठवा, महाराष्ट्राने हिंदुस्थानचा पातशाह औरंगजेबाला इथेच गाडलं, तिथं हे आजचे औरंगजेबी मोदी आणि शहा किस झाड की पत्ती. तुमच्यापैकी अनेक आमदार म्हणतात उद्धव साहेब आम्हाला भेटत नाही. आप्पा, आम्हीसुद्धा म्हणतो आमचे आमदार देखील आम्हाला अनेकदा भेटत नाहीत. आपले कार्यकर्ते म्हणतात, आपला नेता अडचणीच्या वेळेला आमचा फोन उचलत नाही. तुमच्या केबिनमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांपेक्षा ठेकेदार जास्त दिसतात. ज्या ठेकेदारांना ना शिवसेनेबद्दल आस्था आहे ना तुमच्याबद्दल असे संधीसाधू ठेकेदारांची गर्दीत तुम्हाला मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ता दिसत नाही, हे गावागावातून आलेले सामान्य कार्यकर्ते जेव्हा आमच्याजवळ व्यक्त होतात तेव्हा मन पिळवटून जाते. तुमच्या जवळ मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या संघघटनात्मक बैठकीसाठी येऊ इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांपेक्षा लाभार्थी जास्त दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी तोडा असे म्हणत तुम्ही शिंदेंसोबत या बंडात सामील झालेला आहेत ना? मग इथे तालुक्यात राष्ट्रवादीचा नाद सोडा हे तर मी व इतर पदाधिकारी रोज आक्रोश करीत असतो. त्यावरून तुमचे बंडाचे कारण किती खोटे आहे हे पाचोऱ्यातील आपला प्रत्येक कार्यकर्ता सांगेल.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि माजी आमदारांना आपण कायम झुकते माप देता, हे पुन्हा आठवुन देण्याची आज वेळ आली आहे. आप्पा, इतकी कामे करूनही आपण केवळ दोन हजाराच्या जवळपास मताधिक्याने निवडून आला आहात. भविष्यात आपल्याला पुन्हा आमदारकी करायची आहे. विजयी व्हायचे आहे. मागील निवडणुकीत आम्ही कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जिवाचे रान केले. आपल्या संसारावर, घरादारावर दुर्लक्ष करून तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. भाजपच्या लोकांशी व्यक्तिगत दुश्मनी घेतली. आता आम्हा कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आपण अशा प्रकारे शिवसेनेच्या विरुद्ध बंड केल्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य आपण जवळजवळ संपवले आहे. उद्या निवडणुकीला यांना शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हाचे एबी फॉर्म मिळणे आपल्या या चुकीच्या कृतीने दुरापास्त झाले आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्याला सुमितला अजून सेट करायचे आहे. शिंदे साहेब ठाण्यावरून येऊन गावागावांमध्ये आपल्यालाही सेटिंग करून देणार आहेत का? त्यांच्या मुलाला त्यांनी खासदार केले आहे. त्यांचं सेट आहे. हा तुम्ही राहिलेला कालखंड मजेत उपभोगाल. मात्र अडीच वर्षाच्या तुमच्या या सोनेरी कालखंडानंतर निवडणुका येतील त्या वेळेला भाजपचे बंडखोर व भाजपचे विद्यमान तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या विरुद्ध भाजप तुम्हाला मदत करेल का??

“यावेळेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत, उद्धव साहेबांना आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांकडून सुद्धा तुम्ही मतांची अपेक्षा करू नका!” सामान्य कार्यकर्ता आज उघड बोलतोय की, ” सेनेने इतकं देऊन तुम्ही फुटले, आता तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही फुटलो तर..?” अशा प्रकारचे निरोप गावागावांमधून आमच्यापर्यंत येत आहेत. मी व माझ्या सारखे असंख्य पदाधिकारी तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवसेनेच्या व उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, तेव्हा तेव्हा इतिहासाने बंडखोरांचेच भविष्य संपवले आहे. हा साधा इतिहास तुम्ही विसरू नका. आता कळतंय तुम्ही भाजपात किंवा छोट्याश्या पक्षात विलीन होत आहात. याचा अर्थ तुम्ही सेनेचा भगवा सोडला आणि धनुष्यबाण खाली ठेवले. असे करू नका. हि आत्महत्या करू नका आप्पा तुम्हाला खूप कळकळीने विनंती करतो, हे करू नका. तुम्ही इसापनीतीतील आटलेल्या तळ्यातून दुसऱ्या पाण्याच्या तळ्यात घेऊन जातो असे म्हणून माश्यांचा फसवून खाणाऱ्या बगळ्याची गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही अश्या बगळ्याच्या आहारी जाऊन स्वतःला संपवून घेऊ नका!! तुमच्या गटाला कायद्याने धनुष्यबाण चिन्ह शिवसेना हे नाव मिळणारच नाही. राम मंदिर आम्ही पडले नाही शिवसैनिकांनी पडले असे म्हणत कायद्याच्या व लोकांच्या मैदानातून पळणाऱ्या भाजपचे हिंदुत्व फसवे आणि खोटे आहे. स्वार्थी आहे. ते ओळखा आणि माघारी या. तुम्ही विकले जाणार नाही पण लोकांची तोंड रामाला देखील बंद करता आली नाही , सिता मातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. तिथे तुम्ही विकले गेलात हे बोलणाऱ्यांची तोंड तुम्ही कशी बंद करणार, जर तिकडेच राहिलात तर !

आप्पा मी तुमच्या पाया पडतो, उद्धव साहेबांच्या विरुद्ध जाऊ नका. लाल दिवा तुमच्या नशिबात नक्की आहे, तुम्ही असाल तसे सर्व बंध झुगारून मातोश्रीला शरण या. माननीय उद्धव साहेब संवेदनशील व्यक्ती आहेत. ते मोठ्या मनाने माफ करतील. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शिवसेनचे एकमेव आमदार तुम्ही राहाल. भविष्यात जिल्ह्याच्या शिवसेनेच्या राजकारणाचे सर्व सूत्र आप्पासाहेब आपल्याकडे असतील. तुम्ही बाळासाहेबांना मानतात तसे महाराष्ट्रातील तमाम जनता बाळासाहेबांचा आदर करते. त्यांची पुजा करते. बाळासाहेब त्यांचे शिव आहेत. शिवसैनिक त्यांच्यावर खुप भावनिक दृष्ट्या प्रेम करते. म्हणून त्यांच्याच मुलाच्या विरुद्ध केलेले हे बंड कुठलाही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीत सहन करण्याच्या मनस्थितीत आज नाही. ही आग मोठ्या वणव्यात रुपांतरीत होऊन बंडखोरांचं जंगल बेचिराख करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही दोन हजार किलोमीटर दूर असल्यामुळे तुम्हाला इथली परिस्थिती समजत नाही. तुमचे लाभार्थी (बडवे) ही वस्तूस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. मुकुंद आण्णा तुम्हाला जे बोलले ते मनावर घ्या. आज तालुक्यात, मतदार संघात तुमच्या विरुध्द वातावरण तयार होत आहे , वेगाने विरोधात जात आहे म्हणून मला आज हे पत्र लिहावे लागले.

आप्पासाहेब, मी तुमच्यावर एक मित्र म्हणून प्रेम करतो त्या प्रेमातून तुमच्याबद्दल काळजी वाटते, चिंता वाटते, भविष्य भयाण दिसत आहे म्हणून आणि शिवसेनेचा, उध्दवसाहेबांचा प्रामाणिक उपजिल्हाप्रमुख म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा पुन्हा विनंती करतो.

आप्पासाहेब मातोश्रीवर

परत या…
परत या….
*परत या ……!
अजूनही वेळ गेलेली नाही.

जय महाराष्ट्र , जय हिंद,!

तुमचा मित्र तथा उपजिल्हाप्रमुख

ॲड. अभय शरद पाटील

९५५२५९३७८७

Exit mobile version