Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांनी सुरू केली कारवाई : कुर्‍हाडकरांचे उपोषण स्थगित

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुर्‍हाड येथील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करून यात सातत्य राहिल असे आश्‍वासन दिल्याने येथील ग्रामस्थांनी याबाबतचे आपले उपोषण स्थगित केले आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील कुर्‍हाड ग्रामपंचायतीने पाचोरा उपअधीक्षक भारत काकडे यांना मागील आठवड्यात अवैध धंदे बंदी संदर्भात लेखी निवेदन दिले होते. निवेदन दिल्यापासून पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला सक्त आदेश दिल्यानंतर गावातील अवैध धंद्यांवर दररोज धाडसत्र राबवित त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले. यामुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. तथापि, पोलिसांच्या संशयास्पद कारवाईमुळे ग्रामपंचायत कमिटीचे समाधान होत नसल्याचा आरोप व्यक्त होत. ग्रामपंचायत कमिटीने लेखी निवेदन देतेवेळी सांगितले होते की, ३० एप्रिल पर्यंत अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास १ मे पासून पाचोरा पोलिस उपअधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

दरम्यान, याची दखल घेत, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी दि. ३० एप्रिल रोजी संध्याकाळी कुर्‍हाड येथे पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांना सोबत घेत अवैध धंदे संदर्भात तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येथील ग्रामपंचायत हॉल मध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीस सुरुवात करतांना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी अवैध धंदे संदर्भात सर्वांसमोर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी गावातील जनतेच्या अवैध धंदे संदर्भात तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. काही महिलांनी बैठकीत गावातील सट्टा, पत्ता, दारू या संदर्भात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावर गावातील अवैध धंद्यांवरील कारवाईत सातत्य राहिल असे आश्‍वासन भारत काकडे यांनी दिले. गावातील अवैध धंद्यांवर मी स्वतः लक्ष घालून ते मुळासकट बंद करण्याचे आश्वासन भारत काकडे यांनी दिले. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीचे महाराष्ट्र दिनी होणारे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. शांतता समितीच्या बैठकीस सरपंच पती कैलास भगत, उपसरपंच अशोक देशमुख, पोलिस पाटील संतोष सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कौतिक पाटील, डॉ. प्रदीप महाजन, जमील काकार, समाधान पाटील, रमेश मुके, मनोज शिंपी, अशोक बोरसे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, पत्रकार बांधव तसेच गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version