Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीजे रेल्वे पुन्हा सुरू होण्याचे संकेत : खा. उन्मेष पाटलांचे प्रयत्न

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा ते जामनेर अर्थात पीजे रेल्वे पुन्हा सुरू व्हावी यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता ही रेल्वे पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून या संदर्भात आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे बंद असल्याने या मार्गावरील हजोरो प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गावर पुन्हा रेल्वे सुरू व्हावी यासाठी पीजे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. पाचोरा, वरखेडी, पिंपळगाव, शेंदुर्णी, पहूर व जामनेर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन व जनतेच्या स्वाक्षर्‍या घेऊन दिल्ली येथे शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री व रेल्वेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन व चर्चा केली होती. दिल्ली येथे या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार उन्मेष पाटील यांनी केले होते. यामुळे पीजे रुळ काढण्याचे काम थांबवण्यात आले आहे.

संसदेत खासदार उन्मेष पाटील यांनी पीजे रेल्वे लवकर सुरू करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती. त्यानंतर रेल्वे अधिकार्‍यांनी रेल्वे ट्रॅक व रेल्वे स्टेशनच्या परिसराचा आढावा घेतला. पीजे बचाव कृती समितीची पाचोरा येथे बैठक सुरू असताना खासदार उन्मेष पाटील यांच्याशी भ्रमणध्वीनीद्वारे संवाद साधुन कृती समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्यासमोर सर्व परिस्थिती मांडली होती.

या संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांनी २४ मार्चला रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याबरोबर पीजे रेल्वे गाडी संदर्भात बैठक घेतली. तर आज कॅबिनेटमध्ये पीजे गाडी सुरू करण्यासंदर्भात निर्णायक चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पीजे गाडी सुरु होण्याबाबत शक्यता निर्माण झाली आहे.

पीजी रेल्वे सुरु करण्यासंदर्भात दिल्ली येथे यशस्वीपणे बाजू मांडल्याबद्दल पीजे रेल्वे बचाव कृती समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी खासदार उन्मेष पाटील यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, कार्याध्यक्ष ऍड. अविनाश भालेराव, खजिनदार पप्पू राजपूत, सचिव सुनील शिंदे, प्रा. मनीष बाविस्कर, भरत खंडेलवाल, प्रा. गणेश पाटील, रणजीत पाटील, संजय जडे, विकास वाघ, अनिल येवले, अरूण पाटील, संदीप मोराणकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version