Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडइ न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विविध ठिकाणी अवैधरित्या चोरटी वाळुची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) जप्त करत चारही अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना तालुक्यातील गिरणा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळु या गौणखनिजाची ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने राहुल खताळ यांनी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील, विनोद बेलदार, नरेंद्र नरवाडे, अशोक पाटील यांचे पथक नेमुन पुढील कारवाईचे आदेश दिले.

या पथकाने सापळा रचत खेडगाव (नंदीचे) गावानजिक एका ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता सदर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. घटनास्थळावरुन पथकाने २ लाख रुपये किंमतीचे विनानंबर ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त केली. यासोबत, हडसन गावानजिक २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू तसेच पुनगाव ते पाचोरा रस्त्यावरील बुर्‍हाणी इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ ३ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू आणि जारगाव चौफुली जवळ ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीत १ हजार ५०० रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

वरील चारही ठिकाणाहुन ट्रॅक्टर चालक हे पसार झाले असुन चार अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरील चारही घटनांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेडगाव (नंदीचे) येथील तपास पोलिस कॉन्स्टेबल विकास खैरे, हडसन येथील तपास पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, पुनगाव ते पाचोरा रस्त्यावरील तपास पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे तर जारगाव चौफुली येथील तपास पोलिस कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत.

Exit mobile version