ऑक्सीजन अभावी पाचोर्‍यात दोन रुग्णांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सीजनचा साठा संपल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाजप नेते अमोल शिंदे यांनी तातडीने प्रयत्न करून खासगी हॉस्पीटल्समधून ऑक्सीजन मागविल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून तुलनेत पुरवठा कमी होत आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात प्राणवायू अभावी दोन रूग्णांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश राठोड (रा.कुर्‍हाड बुद्रुक, वय ३२) व ग्यारशीबाई चव्हाण (वय ७६, रा. हनुमंतखेडा,ता.सोयगाव) हे दोन रूग्ण अत्यवस्थ अवस्थेत येथे उपचार घेत होते. ऑक्सीजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

येथील १ मे रोजी रात्री ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपल्याने एकच खळबळ उडाली. याप्रसंगी रूग्णालयात साधारणतः ३० रूग्ण उपचार घेत होते, त्यापैकी २ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही बाब येथील भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना कळताच त्यांनी रात्री ग्रामीण रुग्णालय गाठले व प्रसंगावधान साधत त्वरित पाचोरा शहरातील खाजगी डॉक्टरांशी संपर्क करून सर्वांना त्यांच्याकडे असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर देण्याची विनंती केली. तसेच डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना होकार देऊन सिलेंडर घेऊन जाण्यास सांगितले, त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीला घेऊन अमोल शिंदे यांनी हे ऑक्सीजन सिलेंडर रुग्णालयात आणुन स्वतः रुग्णालयात आत मध्ये पोहोच केले. व जोडणी केली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले. त्यामुळे उर्वरित रुग्णांचे प्राण वाचले.

यासाठी डॉ.आनंद मौर्य (आनंद हॉस्पिटल), डॉ. भूषण मगर व सागर गरुड (विघ्नहर्ता हॉस्पिटल) डॉ. पवनसिंग परदेशी (संजीवनी हॉस्पिटल) व अबुलेस शेख (हिंदुस्तान गॅस) यांचे विशेष सहकार्य मिळाले. याकरिता प्रशासना मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी देखील प्रयत्न केलेत. याबाबतीत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ऑक्सिजन संदर्भात कुठल्याही पद्धतीचे नियोजन नसून कायमस्वरुपी ऑक्‍सिजन कमतरता ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना भासत असते, यासाठी प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही तरी पर्यायी उपाययोजना करायला हवी, तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही त्यामुळे रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना इतरत्र फिरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.तसेच या ठिकाणी शौचालयाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून त्या ठिकाणी उभे राहणे देखील अवघड झाले आहे.त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना याचा परिणाम सोसावा लागत आहे.तसेच ग्रामीण रुग्णालयात वॉर्ड बॉय, नर्सेस व इतर कर्मचारी ह्यांच्या अपूर्ण मनुष्यबळामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड वॉर्डात थांबुन रुग्णाची देखरेख स्वतःहा करावी लागते व रुग्णांची इतर सेवा व व्यवस्था ठेवावी लागते.ही खूप मोठी शोकांतिका आहे. असे यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले.

तसेच ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता ही नगरपरिषदेच्या माध्यमातून केली जाते परंतु नगरपरिषद प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाले असून त्याचा देखील परिणाम रुग्णांना सोसावा लागत आहे. तसेच नगरपरिषदेणे जर दोन दिवसात संपूर्ण रुग्णालयाची साफसफाई व स्वच्छता केली नाही तर भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संपूर्ण ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता करून व साफसफाई करून या ठिकाणी निषेध व्यक्त करतील असे अमोल शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Protected Content