वीज धक्क्याने शेतात बालकाचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी येथील शिवारातल्या आपल्या शेतात गेलेल्या बालकाचा उघड्यावर पडलेल्या ताराला स्पर्श झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी हलगर्जी करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी होत आहे.

याबाबत वृत्त असे की, नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या नेरी येथील गणेश रावसाहेब पाटील यांची शेती नेरी कजगाव रस्त्यालगत गट क्रमांक ४६ मध्ये शेती आहे. शनिवारी दुपारी दोन वाजे दरम्यान त्यांचा एकुलता एक नऊ वर्षाचा मुलगा वेदांत कापुस पिकात काम करत असलेल्या आई वडिलांना पाणी देण्या करिता जात होता. वीज पोल वरील कापुस पिकातील तुटलेला तार त्याच्या लक्षात न आल्याने त्यावर पाय ठेवला गेला व शॉक लागुन त्याचा जागीच मृत्यु झाला. ते शेतातच रहात होते. ही बाब लक्षात येताच त्याच्या पालकांनी आरडा ओरड केली. परिसरातील नागरिकांनी चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
वेदांतची मृत्यूची बातमी कळताच नेरी गावातुन वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा विषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुळात ही तार शेतात उघड्यावर पडली कशी ? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. तसेच वीज वितरणच्या कर्मचार्‍याने अधिकारी वर्गाला फोन करुनही रात्री ८ वाजे पावेतो एकही अधिकारी तेथे येऊ शकले नाहीत. त्यांना मनुष्याच्या जीवाची किती काळजी आहे हे यावरून दिसते. महावितरण च्या कामचुकार व निष्काळजी पणा करणार्‍या दोषींनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेदांतच्या मृत्यूमुळे नेरी येथील ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

Protected Content