Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरू पौर्णिमेला महर्षी व्यासमंदीरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या संकटातील दोन वर्षानंतर यंदा यावल येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदीरात गुरु पौर्णिमा निमित्ताने उद्या बुधवारी १३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.                           

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातून व जिल्ह्यातील भाविक मोठया संख्येत महर्षी व्यासांच्या दरबारात हजेरी लावतात. अध्यात्मिक क्षेत्रात गुरु शिष्य परंपरेस अनन्य महत्व आहे.

आख्यायिका –

महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याचे दंतकथा आहे. प्राचीन काळात यावलच्या उत्तरेस असलेल्या सातपुड्याचे घनदाट जंगल यावल ते भुसावळच्या तापी नदीपर्यंत होते असे सांगितले जाते. सध्याच्या येथील हाडकाई खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरिता – सरिता होत. या नद्यांच्या संगमानंतर सूर नदी ही  दक्षिणवाहिनी आहे. शहराच्या बाहेर याच नदीच्या टेकडीवर लोमेश ऋषी राहत होते. एकदा लोमेलोमेशांनी महर्षी व्यासांच्या हातून यज्ञ करण्याचे ठरविले. त्याचवेळेस पांडव अज्ञातवासातून हस्तीनापुराकडे परतत असतांना त्यांनी लोमेशांचे आश्रमात काही काळ विसावा घेतला. पांडव परतीच्या प्रसंगी लोमेश रूषींनी महर्षी व्यासांना यज्ञांचे निमंत्रण दिले होते. महर्षी व्यासांचे हस्ते यज्ञ पार पडला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षींनी काही काळ यावल परिसरात घालवला अशी दंतकथा आहे. याच काळात महाभारताची काही पर्व येथे लिहिण्याचे सांगितले जाते. सप्त चिरंजीवांपैकी महर्षी व्यास एक आहेत. चिरंजीवी महर्षी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याचे परिसरातील नागरिकांची भावना आहे. महर्षी व्यासांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीत व्यासांचे भव्य मंदिर असल्याने दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेस मोठ्या यात्रेयात्रेचे आयोजन केले जातें. महर्षी व्यासांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे येतात.

पौर्णिमेनिमित्ताने यावलला महापूजा –

गुरु पौर्णिमे निमित्ताने यावल येथील महर्षी व्यास मंदिरात सकाळी आठ वाजेला महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजेपासून महाप्रसाद वाटपास सुरुवात होईल. या निमित्ताने मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबीराचे उद्घाटन तहसीलदार महेश पवार यांचे हस्ते  होणार आहे. त्यानंतर मुख्याधिकारी मनोज म्हसे यांचे हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाविकांनी शिस्तीने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महर्षी व्यास व श्रीराम मंदिर विश्वस्तांनी केले आहे.

Exit mobile version