Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात तीन दिवसीय आनंदयात्री परिवर्तन महोत्सवाचे आयोजन

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आनंदयात्री परिवार जामनेर गेल्या काही वर्षांपासून जामनेरमध्ये सांस्कृतिक चळवळ रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. परिवर्तन व आनंदयात्री यांच्या माध्यमातून दरवर्षी कला महोत्सवाचे आयोजन केले जात असून यंदा देखील या महोत्सवाचे आयोजन दि. 23, 24 व 25 सप्टेंबर असे तीन दिवस करण्यात आले आहे.

परिवर्तन जळगाव संस्था सतत नवीन निर्मिती आणि प्रयोगशील संस्था म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. कणकवली, कोल्हापूर, मुंबई, धुळे, पुणे असा महाराष्ट्रभर गाजत असलेला परिवर्तन कला महोत्सव जामनेरात होत आहे. परिवर्तन निर्मित संगीतमय महोत्सव हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे . परिवर्तनचे नाट्य महोत्सव राज्यभर होता आहेतच , या सोबतच संपूर्ण संगीतमय महोत्सव जामनेरला होतो आहे. सर्व स्थानिक कलावंताना घेऊन परिवर्तनने केलेली ही निर्मिती खान्देशातील संगीत क्षेत्रातील कलावंताना आत्मविश्वास देणारी आहे.

या कला महोत्सवाची सुरवात दि. 23 रोजी शुक्रवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि गाण्यांवर आधारित ‘अरे संसार संसार’या कार्यक्रमाने होणार आहे. संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. दि. 24 रोजी वारीचा अनुभव देणा-या दि. बा. मोकाशी यांच्या गाजलेल्या ‘पालखी’ कादंबरीचे संगीतमय सादरीकरण होणार आहे. नाट्य रूपांतर शंभु पाटील यांचे असून दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे आहे. कला महोत्सवाचा समारोप ‘गझल -रेगिस्थान से हिंदुस्थान’ तक या कार्यक्रमाने केला जाणार आहे. संकल्पना दिलीप पांढरपट्टे यांची तर दिगदर्शन मंगेश कुलकर्णी यांचे आहे. या तीनही कार्यक्रमांची निर्मिती परिवर्तन जळगाव संस्थेची असून अशा प्रकारचा परिवर्तनचा महोत्सव जामनेरात दुस-यांदा होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सभागृहात हा महोत्सव दररोज सायंकाळी 6:30 वा होणार असून महोत्सव तीनही दिवस प्रेक्षकांसाठी खुला असणार आहेत.

या महोत्सवासाठी ना. गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असून आयोजनासाठीअध्यक्ष डॉ. अमोल सेठ, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील, खजिनदार आशिष महाजन, सचिव सुहास चौधरी, सहसचिव गणेश राऊत, डॉ. राजेश सोनवणे, सुधीर साठे, कडू माळी, नितीन पाटील, डॉ. पराग पाटील, अमरीश चौधरी, संकेत पमनाणी, बंडू जोशी आदी प्रयत्नशील आहेत. आनंदयात्री परिवार व परिवर्तन संस्था महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

Exit mobile version