पाचोरा कृउबा समितीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय मंडळाच्या काही सदस्यांनी मिळुन घेतलेल्या निर्णया विरुद्ध प्रशासक अनिल महाजन यांनी केलेल्या तक्रारी अर्जावरुन पणन प्रधान सचिव अनुप कुमार यांनी पणन संचालक (पुणे) सतिश सोनी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत  गेल्या काही महिन्यांपासून ७ सदस्यीय प्रशासक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. बाजार समितीच्या प्रोसेडिंग वर प्रशासक यांनी केलेल्या सह्यांचा बेकायदेशीर दूरुउपयोग केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांच्या विरुद्ध प्रशासक अनिल महाजन यांनी १२ रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत बाजार समितीतील चाललेल्या प्रकाराबाबत सखोल चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व पणन सचिव अनुप कुमार उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार मंत्री आणि पणन सचिव अनुप कुमार यांना या विषयी सूचना केली. त्यावरून पणन सचिव अनुप कुमार यांनी पाचोरा बाजार समितीमध्ये आतापर्यंत झालेल्या कामांचा तसेच गाळे करारनामे, गाळेधारकांना पाठीमागील वाढीव भूखंड देणे, शौचालयाचा / मुतारिचा भूखंड, मार्केटमध्ये कॉंक्रिटीकरण करणे, मुख्य कार्यालयाच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवणे तसेच जुने बांधकाम दुरुस्ती करणे, वायफळ खर्च करणे, बाजार समितीत भेटी समारंभ मध्ये जास्तीचा खर्च दाखवणे, मार्केट फी वसुली टेंडर देणे या सर्व बाबीं विषयी लेखी निवेदन अनिल महाजन यांनी मंत्रालयात देवुन सदर बाबी सर्व वरिष्ठांच्या लक्षात आणून देत पणन संचालक यांची दिशाभूल करून घेतलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यासाठी ही निवेदन दिले.

तसेच बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पूर्ण अहवाल व आतापर्यंत पेंडींग असलेल्या त्यांच्यावरील कारवाईच्या चौकशी या सर्व बाबी तक्रारीत नमूद केल्या असून त्या अनुषंगाने पणन सचिव अनुप कुमार यांनी पणन संचालकांना आदेश करत तात्काळ योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करावा अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. यासंबंधीत पणन कक्ष अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीचे पत्र पणन संचालक यांना ई – मेल द्वारे पाठवले आहे.

Protected Content