Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10 किमी क्षेत्र बाधित घोषित करण्याचे आदेश – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease ) या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील या चार संसर्ग केंद्रापासून (Epicentre) 10 कि.मी बाधित क्षेत्र (Infected zone ) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.

लम्पी स्किन डिसीज संसर्गाच्या अनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जतुकीकरण करुन 10 कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहे.

प्रादुर्भाव भागातील जनावरांचा बाजार, यात्रा, पशु प्रदर्शन इ. वर बंदी आणण्याच्या दृष्टीने या ठिकाणाच्या 10 कि. मी परिघातील जनावरांना गोट पॉक्स (Goat pox) लसीकरण तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त पशुसंर्वधन, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना दिले असून त्यांनी या परिसरातील सर्व जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सूचनाही अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी दिल्या आहेत.

 

 

Exit mobile version