Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवगांव शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील देवगांव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले.

या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना अरविंद सोनटक्के म्हणाले, “स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समस्त महिलांना ज्ञानाच्या उजेडाची वाट दाखविणाऱ्या सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या.. ”

व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर महाजन, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते. कार्यक्रमाची सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यांनतर विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात इयत्ता आठवीतील १२, नववीतील १८ आणि दहावीतील १४ अशा एकूण एकूण ४४ विद्यार्थ्यांनीं आपला सहभाग नोंदविला.
यावेळी वकृत्व स्पर्धेत बोलतांना ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला तर काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता सादर केल्या.

यात प्रथम वैशाली पाटील (इयत्ता १० वी), द्वितीय हर्षला पाटील (इयत्ता ९ वी) तृतीय पारितोषिक जयश्री पाटील, वैष्णवी माळी, श्वेता बैसाणे (इयत्ता ८ वी) यांना प्राप्त झाले. तर राजश्री पाटील (इयत्ता ९ वी), रजनी माळी, गायत्री पाटील, यशस्वी पाटील (इयत्ता १० वी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पुढील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. शाळेचे शिक्षक एस.के महाजन यांनी, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार भावी पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रतिमेचे पूजनापेक्षा त्यांच्या विचारांचं पूजन ही जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल” असे सांगितले. ईश्वर महाजन यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं तर आभार प्रदर्शन एच.ओ.माळी यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील यांनी सहकार्य केलं.

Exit mobile version