Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी

जळगाव, प्रतिनिधी । म्युकरमायकोसीस आजाराच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्य सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व मौखिक आरोग्य कार्यक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितिन भारती, डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. गोविंद मंत्री, ज्ञानेश्वर पाटील, गौरव चौधरी, ज्योती गोसावी, सरला पाटील आदी ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की, म्युकरमायकोसीसची लक्षणे मौखिक आरोग्याशी संबंधित असल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले दात, जीभ, डोळे, चेहरा, टाळूचा भाग याची काळजी घ्यावी. यात काहीही बदल अथवा लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून तपासणी करुन घ्यावी.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात मागील वर्षी 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील 144 शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात 1468 नागरीकांचे समुपदेशन केले असून त्यापैकी 114 जणांनी तंबाखू खाणे बंद केले आहे. त्याचबरोबर 1800110456 या टोल फ्री क्रमाकांवर नागरीकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणाऱ्यां 242 व्यक्तीना 7010 रुपयांचा दंड केला असून शाळा सुरु झाल्यानंतर तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे जिल्हा सल्लगार डॉ. भारती यांनी बैठकीत सांगितले.

Exit mobile version