Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमोल कोल्हेंच्या ‘नथूराम’ला आव्हाडांचा विरोध

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसे यांच्या साकारलेल्या भूमिकेवरून वादंग सुरू असतांना आता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराला विरोध दर्शविला आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन सुरू झालेला वाद संपुष्टात येत नसल्याचे दिसून येत आहे. यातच  आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतलाय.

आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारल्याचा निषेध नोंदवलाय. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. तर आपण  या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.पण आता या भूमिकेच्या विरोधात पक्षातूनच विरोधाचे सूर उमटू लागल्याने हा वाद अजून चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.

 

 

Exit mobile version