Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधक मारले जातील, पण सत्य जीवंत राहील- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू असतांना शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर राफेल प्रकरणी हल्लाबोल करत विरोधक मारले जातील, मात्र सत्य जीवंत राहील असा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनामध्ये काळे पान या शीर्षकाखालील अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, जाहीर सभेत तावातावाने बोलावे व झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण आपले पंतप्रधान मोदी संसदेतही करतात. सत्ताधारी पक्षाचे लोक पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर बाके बडवीत असतात. पण त्यामुळे संसदेच्या थोर परंपरेत काही भर पडत आहे काय? विरोधकांना प्रश्‍न विचारण्याचा अधिकार आहे व हा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण. साडेचार वर्षांपासून देशावर मोदींचे एकछत्री राज्य आहे. तरीही महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे हे स्वतःचे अपयश झाकण्यासारखे आहे. काँग्रेसवाले चोर, लफंगे, भामटे व डाकू आहेत. प्रत्येक काँग्रेसवाल्यास भरचौकांत फासावर उलटे लटकवायला हवे. काँग्रेस ही शिवी आहे हे सर्व मान्य केले तरी राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराबाबत विचारलेले प्रश्‍न कायम आहेत. पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटीस विकत घेण्यामागचा तर्क काय? व समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक हा प्रश्‍न विचारीत राहील. राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे. सध्याच्या राजवटीत राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या व्याख्या बदलण्यात आल्या आहेत.

अग्रलेखात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत देशभक्तीवर भाषण
केले. राफेलचे समर्थन केले. दुसर्याच दिवशी राफेल प्रकरणातले काळे पान समोर आले. बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्यांची तोंडे त्यामुळे बंद झाली. देशाचे संरक्षण आणि राफेल संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या हल्ल्यानंतर चोवीस तासांत राहुल गांधी यांनी हा प्रतिहल्ला केला आहे. मोदी यांना पक्षात व बाहेर सच्चे मित्र राहिलेले नाहीत. व्यवहारात भावना नसते. राफेलमध्ये व्यवहार आहेच हे पुराव्यानिशी उघड झाले. उगाच विरोधकांना दोष का देता? सत्यमेव जयते हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील! असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Exit mobile version