Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने ५ ऑगस्टपासून सुरू होणार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील दुकानदारांची दुकाने सुरु करण्याची सातत्याने होत असलेली मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यास शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या 5 ऑगस्टपासून शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्यात येतील. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण उपस्थित होते.

श्री पाटील पुढे म्हणाले की, दिनांक 5 ऑगस्टपासून सुरु होणा-या दुकांनाबाबत सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करुन धोरण, नियमावली निश्चित करावी, गर्दीचा उद्रेक होणार नाही याची दक्षता दुकानदारानी तसेच ग्राहकांनी घ्यावी, राज्यशासनाचे यापूर्वीचे सर्व निर्बंध लागू राहतील, मास्क वापरणे, सॅनिटायाझर, शारीरीक आंतर इत्यादी बाबींचे स्वयंशिस्तीने पालन व्हावे. कोरोनाचा संसर्ग ज्या मार्केटमध्ये आढळेल तेथील दुकाने नियमाप्रमाणे सील करण्यात येतील तसेच माॅल्स मधील दुकाने सुरू केली तरी सिनेमागृह व रेस्टॉरंट मात्र बंदच राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

11 हजार 750 सेवानिवृत्ताना थकीत महागाई भत्ता अदा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 11 हजार 750 सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांचा दोन वर्षापासून थकीत असलेला महागाई भत्ता रक्कम रुपये 61 कोटी 74 लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती ना. पाटील यांनी यावेळी दिली.

मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी पोर्टल बंद झाले आहे. ज्या शेतक-यांनी मका खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. अशा शेतक-यांचा मका शासनाने खरेदी करावा अथवा त्यांना अनुदान द्यावे यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करुन असेही एका प्रश्नाच्या उतरात श्री पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, जिल्हूयातील कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर आता 70% पर्यंत पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. असे असले तरी नागरिकांनी स्वयंशिस्तीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त श्री सतिष कुलकर्णी यांनी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असल्याचे सांगून यात सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीशी विचार विनिमय करुन धोरण ठरविण्यात येईल. शासनाच्या नियमांची त्यांना माहिती देवून नंतर दुकाने सुरू करण्यात येतील.

Exit mobile version