Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात पुन्हा एकच चर्चा : पवार अँड पवार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँकमधील सत्तांतराचे कवित्व संपत नाही तोच आज ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पवार चर्चेत आले आहेत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार हे राजकारणातील एक अवलिया व्यक्तीमत्व होय. स्व. मुरलीधरअण्णा यांचा राजकीय, सहकार व सामाजिक वारसा ते समर्थपणे चालवतांनाच शरद पवार यांच्या कुटुंबाशी असणारे घनिष्ठ संबंध देखील त्यांनी जोपासले आहेत. सहकारात तर त्यांची विलक्षण पकड असून याचमुळे जिल्हा बँकेत ते गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने निवडून येत असून दुध संघातही ते संचालक आहेत. याच्या जोडीला जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनचीही धुरा त्यांच्याकडे आहे. तर मध्यंतरी झालेल्या जेडीसीसी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुरब्बी खेळी करून ते अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्या वेळेस संजय पवार यांच्यावर राष्ट्रवादीतर्फे कारवाई होणार असल्याचा दावा आमदार एकनाथराव खडसे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी केला असला तरी असे झाले नाही.

यानंतर, धरणगाव-एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी थेट आपल्या पक्षाच्या विरूध्द भूमिका घेत महाविकास आघाडी प्रणीत पॅनलच्या विरूध्द शिवसेना-भाजप सोबत हातमिळवणी केली. याप्रसंगी त्या पॅनलच्या फलकांवर शिवसेना व भाजप सोबत थेट अजित पवार यांची देखील प्रतिमा झळकल्यामुळे हा राज्यभरात चर्चेचा विषय झाला होता. तर आज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीमुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या जाहिरातीत चक्क अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला असून याखाली जिवाभावाचा माणूस असे नमूद करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यासोबत त्यांनी थेट शरद पवार यांचा मोदींसोबत तर अजितदादांचा फडणवीस आणि ना गिरीश महाजन यांच्या सोबत देखील फोटो छापला आहे. तर मार्गदर्शकांमध्ये ईश्‍वरबाबूजी जैन व सुरेशदादा जैन यांच्या देखील प्रतिमा आहेत.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आधीच सहकारात राजकारण नसते असे स्पष्ट केले असले तरी ती बाब निवडणूक आणि पदाची निवड यापर्यंत ठिक मानात येईल. तथापि, थेट सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांच्या वाढदिवसाला कट्टर विरोधक असलेल्या आपल्या पक्षाच्या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा आज छापण्यात आल्याची बाब विशेष मानली जात आहे.

Exit mobile version