बालकांसाठी मोफत योग शिबिराचे ऑनलाईन उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । आरोग्य भारती आणि योग समन्वय समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास सात ते पंधरा वयोगटातील दोनशेच्या वर बालकांनी सहभाग घेतला होता. मान्यवरांच्याहस्ते या शिबीराचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

आरोग्य भारती आणि योग समन्वय समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास सात ते पंधरा वयोगटातील दोनशेच्या वर बालकांनी नाव नोंदणी केली असून शिबीर ३ जून ते १० जून असे सात दिवशीय गुगल मिट या ऑनलाईन माधमातून होणार आहे. बालकांसाठी मोफत होणाऱ्या या शिबिरास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. निलेश पाटील. आरोग्य भारतीच्या अध्यक्षा डॉ. लीना पाटील आणि देवगिरी प्रांताचे योग प्रमुख डॉ. चारुदत्त देशपांडे आदि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असेल असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या रक्षणार्थ आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुलांना आसन, प्राणायाम, मुद्रा आदींच्या ज्ञानासोबत शंखनाद देखील शिकविण्यात येणार आहे. मुलांची प्राणशक्ती वाढविण्यासाठी हास्ययोग, शंखनाद आणि प्राणायाम या त्रिसूत्रीचा वापर सदर कार्यशाळेत करण्यात येत आहे.

कार्यक्रम प्रसंगी जळगाव विभाग प्रमुख कृणाल महाजन यांनी प्रस्तावना केली तर पल्लवी उपासनी यांनी सूत्रसंचालन केले जळगाव जिल्हा प्रमुख चित्रा महाजन यांनी आभार प्रदर्शित केले. शिबिराला यशस्वी बनविण्यासाठी अक्षय सोनार, योगराज चौधरी, प्रतिभा कोकंदे, सोनाली पाटील, सीमा पाटील, डॉ.शरयू विसपुते आदींनी सहकार्य केले आहे.

Protected Content