ऑनलाईन फसवणूक : कर्ज घेणाऱ्या तरूणाची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून घेतलेले ऑनलाईन काढलेले कर्ज व व्याज देवूनही पुन्हा पैश्यांची मागणी करत तरूणाच्या नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून ५३ हजार ५९३ रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.  याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील २८ वर्षीय तरूण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याने ऑनलाईन सेवा केंद्राचे दुकान असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. २९ मार्च २०२२ ते ८ जून २०२२ दरम्यान तरूणाने कॅश ॲडव्हान्स नावाच्या मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ हजाराचे ऑनलाईन लोन घेतले. तरूणाने लोन घेतले परंतू सर्व्हीस चार्ज म्हणून ८८ हजार ८१० रूपये कापून घेतले व उर्वरित १ लाख ४० हजार २५४ रूपये खात्यात जमा झाले. समोरील अज्ञात मोबाईल धारकांनी सात दिवसाच्या आत पैश्यांची मागणी केली. त्यानुसार तरूणाने १ लाख ४० हजार २५४ रूपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज ५३ हजार ५६४ रूपये असे एकुण १ लाख ९३ हजार ८१८ रूपये परत केले. दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अजून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबियांची बदनामी करू अशी धमकी दिली. तसेच तरूणाच्या मोबाईलचा डाटा चोरून तरूणासह नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तरूणाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ११ जून रोजी दुपारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Protected Content