Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील प्रत्येक मतदाराचा एक लाखाचा अपघाती विमा

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत आहेत. १ लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तसेच ज्या मालमत्ताधारकांना एक किंवा दोनच अपत्य त्या देखिल मुली असतील तर त्यांना घरपट्टीत १ टक्के सूट देण्याचा महत्वाचा निर्णयाला महापालिकेच्या विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी आज विशेष महासभेत सुमारे १४५८ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह सादर केले. अंदाजपत्रकात कुठलीही करावाढ नाही. तसेच नागरी सुविधांच्या तरतुदींमध्ये स्थायीने वाढ केल्याची माहीती त्यांनी दिली. राजेंद्र घुगे पाटील यांनी अंदाजपत्रकास अनुमोदन दिले. त्यानतंर उपमहापौर डा. आश्विन सोनवणे यांनी अंदाजपत्रक महासभा मंजूर करीत असल्याची घोषणा केली.

जळगाव महापालिकेच्या विशेष महासभा आज दुपारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर डा. अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पुलवामा येथिल घटनेचा बदला घेतल्याप्रकरणी लष्काराचे तसेच पराक्रमाबद्दल अभिनंदन वर्धमान यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच यावर शंका घेणाऱ्या राजकीय व्यक्तींच्या निषेध केला. स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांनी यावेळी महापौर सीमा भोळे यांच्याकडे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १४५८ कोटी ६० रुपयांचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह सादर केले. यावेळी विरोधी गटनेते शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितिन लढ्ढा यांनी दिलासादायक अंदाजपत्रक असल्याचे सांगत आता प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रशासनाने १११७ कोटींचे अंदाजपत्रक दिले होते. त्यात स्थायी समितीमध्ये चर्चा होवून त्यात मुख्यमंत्री यांनी दिलेले १०० कोटी तसेच गाळे भाड्याची कमी दशविलेली रक्कम वाढवून दुरुस्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच विविध नागरी सुविधांच्या तरतुदींमध्ये देखिल भरीव वाढ केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अंदाजपत्रक आता १४५८ कोटी रुपयांचे झाल्याचे ते म्हणाले. स्थायी सभेत सुचविलेल्या सूचनांचा समावेश केल्याने स्थायी सभापती यांनी सादर केलेले अंदाजपत्रक दिलासादायक असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक नितिन लढ्ढा यांनी सांगीतले. या चांगल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी प्रशासनाने पूणपणे करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version