Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जि.प.सभागृहात “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” एकदिवशीय प्रशिक्षण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ, एस.बी.सी.-३ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम मागील दोन वर्षापासुन राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स यांचे एकदिवशीय प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज सभागृह जिल्हा परिषद जळगाव येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत  यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार जळगाव जिल्ह्यात २८% बालविवाह होतात. तर महाराष्ट्राच्या तुलनेत जळगाव जिल्हा अकराव्या क्रमांकावर आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आय. सी. डी. एस., पंचायत विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व विभागाचा एकत्रित बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा तयार आला असून सदर आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी विभागनिहाय तालुका निहाय १ असे एकूण ७२ चॅम्पियन्स निवड करून यांना आज बालविवाह निर्मुलनासाठी प्रशिक्षण देण्यात आले. हे चॅम्पियन्स आराखडा देखरेख, सनियंत्रण व अहवाल व्यवस्थापन बाबत कामकाज बघतील. तसेच गुगल फॉर्म द्वारे माहिती जमा करण्यास सहकार्य करतील. जळगाव जिल्हा १००% बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने गावागावात साधने निर्माण करावे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. सर्व विभागांनी आरखड्या नुसार ठरवून दिलेले कार्यक्रम करावे व त्याची माहिती गुगल फॉर्म द्वारे सादर करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी केले. त्यामुळे बालविवाहाला आळा घालण्यास मदत होईल यामुळे जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी सर्वांनी योगदान दयावे असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित  यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांनी केले.

 

या प्रशिक्षणास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, एस.बी.सी.चे  संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार तसेच शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग , आय.सी.डी. एस. , जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व विभागाने नियुक्त केलेले सर्व चॅम्पियन्स यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून युनिसेफ एस.बी.सी.-३ चे निशित कुमार व राज्य समन्वयक नंदू जाधव, जिल्हा प्रकल्प समन्वयक श्रीकांत भोरे यांची उपस्थिती होती.

 

Exit mobile version