Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्टेशनवर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेच्या थांब्यासह भुसावळ – मुंबई पॅसेंजर पुर्ववत सुरु करण्यात यावी, या मागण्यांसाठी आज दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून रेल्वे स्थानकाजवळ पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

कोरोना महामारीच्या काळानंतर सुरू झालेल्या रेल्वेच्या वेळापत्रकात फार मोठ्या प्रमाणात बदलले करण्यात आला आहे. त्यामुळे पाचोरा रेल्वे स्टेशनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दररोज सायंकाळी सहा वाजेनंतर पाचोरा येथुन मुंबईत जाण्यासाठी कोणतीही रेल्वे उपलब्ध नाही. त्यासाठी विदर्भ एक्सप्रेस, पंजाब मेल या दोन गाड्यांना पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. या मागण्यांसाठी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने अतिशय सोयीची असलेली भुसावळ – मुंबई पॅसेंजर जी आर्थिक दृष्ट्या गोरगरीब व सामान्यांना परवडणारी पॅसेंजर त्वरित सुरू करावी व लोक भावनांचा आदर करावा.

त्याच प्रमाणे देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या कोटा (राजस्थान) व पुणे (महाराष्ट्र) या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने तसेच आय.टी. हब म्हटले जाणारे बंगलोर या ठिकाणी पाचोरा परिसरातील अनेक तरुण नोकरी, व्यवसायासाठी जातात त्यामुळे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांना जोडणाऱ्या गाडी क्रं. १२६२७ कर्नाटक एक्सप्रेस, गाडी क्रं. ०९७४० साईनगर – जयपुर कोटा एक्सप्रेस, गाडी क्रं. १६५०१ अहमदाबाद – बेंगलोर एक्सप्रेस, गाडी क्रं. १६७३४ ओखा – रामेश्वर एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा येथे थांबा देऊन जनतेला दिलासा मिळावा यासाठी आजचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला व्यापारी असोसिएशन, शैक्षणिक संस्था, डॉक्टर्स असोसिएशन, सराफ असोसिएशन, एकता रिक्षा युनियन, राजकीय संघटना, सामाजिक संघटना, किराणा असोसिएशन, कांतीभाऊ दायमा यांनी धरणे आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दर्शवला आहे. वरील रास्त मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको सारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी आंदोलन कर्त्यांनी रेल्वे प्रशासनास दिला आहे. या विषयीचे निवेदन जनरल मॅनेजर (मुंबई), डी. आर. एम. (भुसावळ), स्टेशन प्रबंधक (पाचोरा) यांना देण्यात आले आहे.

धरणे आंदोलनामध्ये पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, संयोजक विलास जोशी, सरचिटणीस नंदकुमार सोनार, सचिव सुनिल शिंदे, खजिनदार पप्पू राजपूत, उपाध्यक्ष भरत खंडेलवाल, विकास वाघ, गणेश पाटील, संजय जडे, विधी सल्लागार अॅड. अण्णा भोईटे, अनिल (आबा) येवले, किशोर डोंगरे, अशोक मोरे, बंडू मोरे सह पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version