Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेसीएल टी-20च्या तिसर्‍या दिवशी कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व खान्देश ब्लास्टर्स विजयी

jcl 1

जळगाव (प्रतिनिधी) – संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रतनलाल सी. बाफना यांच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20च्या संघांमध्ये सेमीफायनलमध्ये पोहचण्याची चुरस वाढलेली आहे. तिसर्‍या दिवशी तीन सामने खेळवले गेले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स व खान्देश ब्लास्टर्स हे संघ विजयी झाले. खान्देश ब्लास्टर्सचा हा जेसीएल टी20 मधला तिसरा विजय ठरला. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्सचा खेळाडू दिलीप विश्वकर्मा व सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्सचा खेळाडू प्रतिक चतुर्वेदी सामनावीराचे मानकरी ठरले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवाणीमध्ये आज अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशील स्कूलच्या विद्यार्थीचे तबला वादन व इपिक 5678 डान्स अ‍ॅकॅडमी तर्फे सादर करण्यात आलेल्या नवरात्री नृत्याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. जळगावात जेसीएलचे पहिल्यांदाच आयोजन होत असल्याने सहभागी सर्व खेळाडूंचा उत्साह व जोश वाढलेला आहे. त्यामुळे जेसीएलचा पहिला विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. जेसीएल टी20 ला बेन्झो केम, सातपुडा ऑटोमोबाईल, आय केअर ऑप्टिकल, कांताई नेत्रालय, दाल परिवार, पगारिया बजाज, मकरा एजन्सीज, कोठारी ग्रुप नमो आनंद, फ्रुटुगो, हिरा रोटो पॉलिमर्स, भंडारी कार्बोनिक यांचे सहकार्य लाभले आहे.

जेसीएलमध्ये सहा दिवसात एकूण पंधरा सामने होणार आहेत. दुसर्‍या दिवशी रात्री उशिरा संपन्न झालेल्या तिसर्‍या सामन्यामध्ये के.के. थंडर्स संघाने वनीरा ईगल्स संघाचा पराभव केला. के.के थंडर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 7 बाद 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळतांना वनीरा ईगल्स संघाला निर्धारीत 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 144 धावाच करता आल्या. के.के थंडर्स तर्फे सर्वाधिक धावा करणारा हितेश पटेल हा सामनावीराचा मानकरी ठरला. दुसर्‍या दिवशी संपन्न झालेल्या तीन सामन्यौपकी पहिला सामना स्पेक्ट्रम चॅलेंजर्स विरुद्ध मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स यांच्यात खेळविला गेला. टॉस श्री लक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक अवंत जैन यांच्या हस्ते करण्यात आला. हा सामना मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाने 8 गडी राखुन जिंकला. स्टेक्ट्रम चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करुन 9 गड्यांच्या मोबदल्यात 119 धावा केल्या.

जगदिश झोपे याने 21 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 32 धावा केल्या. सागिर शाहने 23 धावांचे योगदान दिले. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाकडून आमिर खान व जावेद शेख यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शुभम पाटीलने उत्तम गोलंदाजी करीत 3 षटकांमध्ये फक्त 5 धावा दिल्या. मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघातर्फे दिलीप विश्वकर्मा याने 48 चेंडूमध्ये 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 56 सर्वाधिक 56 धावा केल्या. संकेत पांडेने 29 चेंडूत 37 धावा (4 चौकार व 2 षटकार) केल्या. मेहुल इंगळे व जगदिश झोपेने प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिलीप विश्वकर्मा हा सामनावीराचा मानकरी ठरला.

दुसरा सामना खान्देश ब्लास्टर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. टॉस केशरी टुर्सचे कपिल पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. खान्देश ब्लास्टर्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांमध्ये 9 बाद फक्त 183 धावा केल्या. सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स तर्फे शिव पुरोहित, हसिन तडवी, सुरज मैत्य यांनी प्रत्येक 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळतांना सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स संघ निर्धारीत 20 षटकांत 5 बाद 169 धावा करु शकला. त्यामुळे खान्देश ब्लास्टर्सने हा सामना 14 धावांनी जिंकला. सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स तर्फे प्रतिक चतुर्वेदीने कडवी झुंझ देत 58 चेंडूंमध्ये 15 चौकारांच्या साहाय्याने 88 धावा केल्या. नचिकेत ठाकुर, घनशाम चौधरी, धवल हेमनानी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रतिक चतुर्वेदी सामनावीराचा मानकरी ठरला. शेवटचे वृत्त हाती येई पर्यंत दुसर्‍या दिवसाचा तिसरा सामना एम.के. वॉरियर्स विरुद्ध रायसोनी अचिव्हर्स यांच्यात रंगला होता.

तबला वादन व नवरात्री नृत्याने वेधले लक्ष
जेसीएलच्या सामन्यांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलमध्ये जोश भरण्यासाठी व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दररोज सामन्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये आज शहरातील अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशीअल स्कूलच्या 12 विद्यार्थ्यांनी तबला वादन केले. त्यांच्यासह भुषण गुरव व निखिल क्षिरसागर हे शिक्षकही होते. त्यांनी त्रिसालमध्ये कायदा, रेला, मुखडे, चक्रधार, परल या बंदशी सादर केल्या. तसेच इपिक 5678 डान्स अ‍ॅकॅडमीच्या मुलींनी नवरात्री नृत्य सादर केले. हे नृत्य लोकेश साळुंखे व सागर सोनवणे यांनी बसविले होते. सादर करण्यात आलेल्या तबला वादन व नवरात्री नृत्याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.त्यांचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.

आज होणारे सामने
15 मार्च 2019 रोजी ही जेसीएल टी 20 मध्ये तीन सामने खेळविले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना सकाळी 9 वाजता वनीरा ईगल्स विरुद्ध रायसोनी अचिव्हर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. दुसरा सामना दुपारी 3 वाजता एम.के. वॉरियर्स विरुद्ध के.के. थंडर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. तिसरा सामना सायंकाळी 7.15 वाजता स्पेक्ट्रम चॅलेंजर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात रंगणार आहे.

जिल्ह्यातील क्रिकेटला चालना देणे हा जेसीएलचा मुख्य उद्देश आहे. खेळाडूंना आपल्याच शहरात संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी उत्तम क्रिकेट बघण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएल बघायला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version