Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला दिनाच्या अनुषंगाने मुक्ताईच्या दरबारी पारायण, नामसंकीर्तनाची शिदोरी

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथे महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता दि.१० मार्च रोजी ह.भ.प. दुर्गा संतोष मराठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

तिर्थक्षेत्र संत मुक्ताईच्या जुने कोथळी येथील मुक्ताई मूळ मंदिरात गेल्या वर्ष भरापासून यंदाचे मुक्ताई अंतर्धान सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (725 वे वर्ष) वर्ष अखंड कथा, पारायण व नाम संकीर्तन सप्ताहाचे कार्यक्रमांची शृंखला सुरू असून याच कार्यक्रमांतर्गत दि.८ मार्चचा जागतिक महिला दिनाचा पर्वकाळ साधला जावा म्हणून या ठिकाणी महिला कीर्तनकार आयोजित सप्ताहाचे आयोजन दि ३ मार्च ते १० मार्चपर्यंत करण्यात आले होते.

मुक्ताईच्या दरबारातील संपूर्णतः महिला सहभाग असलेला पहिला व ऐतिहासिक सप्ताह ठरला असून या कार्यक्रमात पारायण, प्रवचन , काकडा , हरिपाठ , रात्रीचे श्रवणीय कीर्तन, गायन, मृदंग वादन यांचे नेतृत्व महिलांनी केले. या कार्यक्रमाची सांगता दि.१० मार्च रोजी ह भ प सौ दुर्गा संतोष मराठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

“हरिनें माझे हरिले चित्त। भार वित्त विसरले ॥
आतां कैसी जाऊं घरा। नव्हे बरा लौकीक ॥
पारखियांसी सांगतां गोष्टी। घरची कुटी खातील ॥
तुका म्हणे निवांत राहीं। पाहिले पाहीं परतोनी ॥”

या जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या सुंदर गवळणद्वारा त्यांनी मुक्ताईच्या दरबारात सुश्राव्य काल्याचे कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाच्या सांगता समारोप वेळी सर्वच महिला अतिशय भावूक झालेल्या दिसून आल्या नव्हे नव्हे त्या अश्रूंचा बांध आवरू शकल्या नाही. जणू त्यांना या कार्यक्रमाची सांगता होऊच नये असे वाटत होते. मुक्ताईचा विरह सांगून जात होता की येथे जणू भक्तीचा मळा अतिशय श्रद्धेने व तळमळीने फुलला होता.

ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व ह भ प गोदावरीताई बंड,सस्ती वाडेगाव , साध्वी मिराताई चौधरी ,सिंगाईतकर यांनी केले तर यांची होतील प्रवचन व कीर्तन सेवा ह भ प उषाताई महाराज (जळगाव) , ह भ प सौ वंदनाताई जैस्वाल (लिहा), ह भ प सौ शारदाताई महाजन , जांभूळधाबा , ह भ प शास्त्री ताई (मलकापूर) ,मुक्ताईनगर, ह भ प अलकाताई वायकोळे, जळगाव ,ह भ प रेणुकाताई जाधव (चिखली) ह भ प उषाताई महाजन, चिंचखेडा, ह भ प रेखाताई गुरव , वरणगाव , ह भ प जिजाबाई भोजने, काकोडा, ह भ प सुषमाताई संभारे, बाल प्रवचनकार, ह भ प शक्ती हरणे, मुक्ताई संस्थान, ह भ प चित्राताई राणे, गाडेगाव, ह भ प पार्वताताई महाराज (आळंदी देवाची.), ह भ प सौ मालतीताई टीटगावकर, ह प सौ चंदाताई गायकवाड आढाव,घारड, ह भ प सौ इंद्रायणीताई मोरे मालेगाव,ह भ प सौ प्रतिभाताई सोनवणे , जळगाव , ह भ प सौ इंद्रायणीताई बगाडे- सातव, उमाळी, गायनाचार्य : ह भ प पार्वताबाई महाराज आळंदी देवाची, ह भ प चंदाताई गायकवाड आढाव , घारड , ह भ प अलकाताई महाराज सिल्लोड, ह भ प चित्राताई राणे, मृदंगाचार्य : ह भ प वैष्णवीताई पाटील , वडगाव , टाळकरी म्हणून देशमुख ताई, बोलकर ताई व इतर महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला. कार्यक्रमाच्या संयोजक दुर्गा मराठे , चित्रा राणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड रवींद्र पाटील , पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्रजी हरणे महाराज, सखाराम महाराज यांचे वंशज ह भ प तिजारे महाराज , जुने मंदीर व्यवस्थापक ह भ प उद्धव महाराज जुनारे, ह भ प भाऊराव महाराज यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Exit mobile version