Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता ?

मुंबई वृत्तसंस्था । आतापर्यंत अनलॉकचे तीन टप्प झाले आहेत. तिसरा टप्पा ३१ ऑगस्टला पुर्ण होणार असून, त्यानंतर अनलॉक ४ जाहीर केला जाणार आहे. अनलॉक ४ मध्ये अर्थात सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. मात्र, तरीही शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच होता. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते.

शाळा-महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारला शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली. तर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावीच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग सुरू करू. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

करोनामुळे शैक्षणिक वर्षालाच मोठा फटका बसला आहे. परीक्षांचा हंगाम असतानाच मार्चमध्ये कोरोनाचं संकट गडद झाल्यानं केंद्र सरकारनं परीक्षा लांबणीवर टाकत लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर अनेक राज्यांनी काही परीक्षा रद्द केल्या, काही पुढे ढकलल्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या.

Exit mobile version