Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ जुलै रोजी राज्यभरात नवीन कायद्यातंर्गत २४४ गुन्हे दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात १ जुलैपासून लागू झालेल्या नवीन कायद्यांअंतर्गत राज्यभरात रात्री उशिरापर्यंत २४४ गुन्हे दाखल झाले. मालमत्ता चोरी अथवा गंभीर गुन्ह्यांचा विचार केल्यास पहिला दरोड्याचा गुन्हा अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) ३०९(४) अंतर्गत दाखल झाला. तर सायबर फसवणुकीचा पहिला गुन्हा मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला. नवीन कायद्याअंतर्गत मुंबईत ५३ गुन्हे दाखल झाले होते. नव्या कायद्याअंतर्गत ऑनलाईन तक्रारही करण्याची तरतूद आहे. त्यानुसार दुपारपर्यंत आठ ऑनलाईन तक्रारी राज्य पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदे १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत नवीन कायद्यांतर्गत राज्यात २४४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नवीन कायद्यांतील तरतुदींनुसार अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा क्रमांक ५६१/२०२४ नोंदविण्यात आला. मालमत्ता चोरी अथवा गंभीर गुन्ह्यांचा विचार केल्यास हा पहिला गुन्हा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात काही दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालमत्ता चोरीचा हा राज्यातील पहिला गुन्हा म्हणता येईल, अशी माहिती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली.

Exit mobile version