Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.

भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. मोदी आणि गांधींनी अध्यक्षपदांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी खूर्ची स्वीकारली. बिर्ला यांचा गेल्या टर्ममध्ये अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले. दरम्यान, काल (२५ जून) संध्याकाळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमत होऊ न शकल्याने त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंडिया आघाडीच्या वतीने के.सुरेश यांनी अर्ज केला होता.

लोकसभाध्यक्षांची नियुक्ती बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर विरोधकांशी बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. राजनाथ सिंह यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सोमवारीपासून फोनवरून संपर्क केला होता व सहमतीने लोकसभाध्यक्षांची निवड करण्याची विनंती केली होती. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर काँग्रेससह इंडियातील घटक पक्षांनी सहमतीही दाखवली होती. मात्र उपाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर ही बोलणी फिस्कटली.

Exit mobile version