Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात जीर्ण इमारत कोसळली; तिघे वाचले, महिला ढिगार्‍याखाली अडकली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात एक अतिशय जुनी इमारत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याच्या ढिगार्‍याखाली एक महिला अडकल्याचे वृत्त आहे.

(Image Credit Source: Live Trends News )

साधारणपणे पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळण्याचा धोका असतो. या अनुषंगाने या इमारती खाली करण्याचे वा ती पाडून टाकण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने दिले जातात. तथापि, अनेकदा या आदेशांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असून यामुळे लहान-मोठ्या दुर्घटना होत असतात. अशाच प्रकारची दुर्घटना ही जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगराच्या परिसरात झाली आहे.

व्हिडीओत पहा : जळगावात कोसळली पुरातन इमारत

आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज नगरातील एक इमारत अकस्मात कोसळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात प्रशासनाला माहिती देण्यात आली. यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. महापालिका प्रशासनाने तात्काळ जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटविण्यास प्रारंभ केले. तर, या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व महापौर जयश्रीताई महाजन यांनी देखील तेथे धाव घेतली.

व्हिडीओत पहा : पालकमंत्र्यांनी दिलेली माहिती

दरम्यान, दुर्घटनेच्या ठिकाणी अग्नीशामक दलाच्या पथकासह आपत्कालीन मदतकार्य करणारे पथक दाखल झाले असून ढिगारा हटविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती देतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सदर इमारतीच्या ढिगार्‍याखाली चार लोक दाबले गेले असून यातील तिघांना वाचविण्यात आले असले तरी एक वृध्द महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमिवर अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घेतल्याचेही ना. गुलाबराव पाटील याप्रसंगी म्हणाले.

व्हिडीओत पडा : जीर्ण इमारतीचे सुरू असलेले बचावकार्य

दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटविण्याच्या कामाला वेग दिला होता. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे आदींसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. स्वत: आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या बचाव कार्यावर नजर ठेवून होत्या.

Exit mobile version