Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना महामारीत शासकीय नियम पाळणे देवपुजे एवढेच श्रेष्ठ – आ. राजूमामा भोळे

जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीत शासकीय नियम स्वयंशिस्तीने पाळणे देवपुजे एवढेच श्रेष्ठ आणि आपत्तीत प्रत्येक नागरीकाने स्वयंशिस्त पाळणे सर्वार्थाने देशसेवा आणि समाजसेवाच आहे असे मार्मिक प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमात केले आहे. 

श्री विश्वकर्मा जयंती जळगाव येथील समाज बोर्डिंगमध्ये गुरुवार (दि.२५ फेब्रुवारी २०२१) रोजी विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळ, महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, सुतार समाज जन जागृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साध्या पद्धतीने साजरी झाली. त्यावेळी राजूमामा भोळे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव असून ज्येष्ठ समाजसेवक तथा सचिव एम.टी.लुले, निवृत्त मुख्याध्यापक सुपडू सुतार ,पुरुषोत्तम चव्हाण मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे अग्रपूजन आमदार राजूमामा भोळे यांनी करून पुष्पमाला अर्पण केली. त्यानंतर सामुहिक आरती होऊन सर्व उपस्थितांनी अभिवादन करीत तीर्थप्रसाद घेतला. आमदार राजूमामा भोळे यांचा समाजातर्फे कृतज्ञतापूर्वक शाल, श्रीफळ, पुस्तकासह पुष्पगुच्छ देऊन निवृत्त मुख्याध्यापक सुपडू सुतार यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.

कोरोना संक्रमणाच्या गंभीर परिस्थितीत शासकीय आदेशान्वये सुरक्षित अंतर ठेवून, मास्क लावीत, सॅनिटायझरचा वापर करून नियमांची अंमलबजावणी सर्वांनी केल्याबद्दल राजू मामांनी समाजाबद्दल प्रशंसोद्गार काढले. राजू मामांनी अनौपचारीक मैफीलीत समाजाच्या समस्या ऐकून घेत सांगोपांग चर्चा केली. कार्यक्रमास विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाचे कार्यकर्ते मनोहर रुले, निलेश सोनवणे, विजय लुल्हे, महाराष्ट्र विश्वकर्मा सेनाध्यक्ष प्रमोद रुले, सेना प्रदेश सदस्य भागवत रुले, सुतार समाज जनजागृती महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मेथाळकर, मीना रावळकर , दामिनी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मेथाळकर, वैभव सुर्यवंशी, सिद्धू चव्हाण यांसह समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्तावना एम.टी.लुले, सूत्रसंचालन भागवत रुले,आभार मनिषा मेथाळकर यांनी मानले.

 

 

Exit mobile version