Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसींना आरक्षण देणारच : फडणवीस  

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीमुळेच ओबींसींचे आरक्षण गेल्याचा आरोप करत आरक्षण मिळो वा ना मिळो, आम्ही ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणारच असल्याचे प्रतिपादन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपच्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी सत्ताधार्‍यांवर घणाघाती टीका केली.

मुंबईतील वसंत स्मृती सभागृहात आज भाजपाच्या ओबीसी मोर्चातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला संबोधित करताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नसो आम्ही ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणारच. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय चिघळला गेला असा आरोपही फडणवीस यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, सत्तेत आल्यापासून यांना इम्पेरिकल डेटा देखील गोळा करता आला नाही. कोर्टानं वारंवार झापूनही यांच्यातला कोणतरी एक जण उठतो आणि केंद्राची जबाबदारी आहे सांगत सुटतो. अरे मग तुम्ही सरकारमध्ये कशाला आहात? द्या ना मग केंद्राच्या हाती. केंद्र सरकार चालवेल आणि करुनही दाखवेल. भाजपाचा डीएनए हा ओबीसी आहे. देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. भाजपाप्रणित सरकारमध्ये सर्वाधिक मंत्री ओबीसी आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हैणाले की, महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली. यात मोठं षडयंत्र असून सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही केली गेली नाही. त्यानंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला. याला संपूर्णपणे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version