Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.

त्यातच आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी हाके यांची भेट घेतली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केले आहेत. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडत चालली असून अशक्तपणाही आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला. मात्र, हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे. तर, डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपले प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे.

Exit mobile version