मविप्र वाद प्रकरणी जळगावात पाच ठिकाणी छापे

जळगाव प्रतिनिधी | मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेतील वाद प्रकरणी विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आज जळगावात पाच ठिकाणी छापे मारण्यात आले असून यात भोईटे गटातील मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात भोईटे गटासह आमदार गिरीश महाजन आणि इतर अशा २९ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात या सर्वांना मोक्का लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली असून या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज भल्या पहाटे जळगावात पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले.

निलेश रणजीत भोईटे, तानाजी भोईटे, महेंद्र भोईटे, प्राचार्य एल. पी. देशमुख आणि प्रमोद काळे यांच्या जळगावातील निवासस्थानी पुणे पोलिसांचे सुमारे ७० कर्मचार्‍यांचे पथक दाखल झाले असून पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात त्यांनी अद्याप काहीही माहिती देण्यास नकार दिला असून तपास पूर्ण झाल्यानंतरच त्या प्रसारमाध्यमांना माहिती देणार आहेत. दरम्यान, विजय भास्कर पाटील यांनी या सर्व संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी केलेल्या मागणीनंतर हे छापे टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content