Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोपवाटीका धारकांना बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ज्या रोपवाटीकाधारकांकडे बियाणे विक्री परवाना नसल्यास त्यांनी तात्काळ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन बियाणे विक्री परवाना मिळण्यासाठी विहीत पध्दतीत प्रस्ताव सादर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

बियाणे कायदा 1966 च्या खंड 2 च्या उपखंड (11) मध्ये परिभाषित “बियाणे” च्या व्याख्येनुसार सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळे (महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, 1969 व (सुधारणा) 1997 अंतर्गत समाविष्ठ असलेली फळपिके वगळून) रोपवाटीका धारकांना बियाणे व बियाण्यांपासून रोपे निर्मिती करुन विक्री करावयाची किंवा करीत असल्यास बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

खाद्यतेलवर्गीय बियाणे/रोपे, सर्व प्रकारचे फळे बियाणे/रोपे (पपई इ.), सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे/रोपे (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगे इ.) सर्व प्रकारचे कापूस बियाणे/रोपे (संकरीत व सुधारीत), पशुखाद्यासाठी वापरण्यात येणारे बियाणे/रोपे, ज्युट बियाणांची रोपे निर्मिती करुन विक्री करावयाची किंवा करीत असल्यास बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक आहे.

तरी वरीलप्रमाणे उत्पादन/विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ज्या रोपवाटीकाधारकांकडे बियाणे विक्री परवाना नसल्यास त्यांनी तात्काळ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन बियाणे विक्री परवाना मिळण्यासाठी विहीत पध्दतीत प्रस्ताव सादर करावा. जर कोणी विनापरवाना रोपवाटीकाधारक बियाणे विक्री करतांना आढळून आल्यास त्यांचेवर बियाणे नियंत्रण आदेश 1983 अंतर्गत तरतुदीनुसार उचित कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version